नाशिकमधील मनपाच्या पुर्व विभागातील १९ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 09:00 PM2017-11-11T21:00:47+5:302017-11-11T21:08:05+5:30
वाहतुकीला अडथळा ठरणा-या शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली.
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रहदारीला अडथळा ठरणा-या अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा चौथा दिवस शनिवारी (दि.११) शांततेत पार पडला. दिवसभरात पूर्व विभागातील १९ धार्मिक स्थळे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.
वाहतुकीला अडथळा ठरणा-या शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव दलाच्या तुकडीचा वाढीव बंदोबस्त या मोहिमेसाठी पुरविण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलिसांचा फौजफाटा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत संरक्षणासाठी देण्यात आलेला होता.
मोहिमेला संभाजी चौक, उंटवाडी रस्त्यावरून सकाळी दहा वाजता प्रारंभ करण्यात आला. यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथक मुंबई नाकामार्गे शिवाजीवाडी, भारतनगर परिसरात पोहचले. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाचा अतिक्रमित बांधकाम हटविल्यानंतर शिवाजीवाडीसमोरील वडाळा रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली. यानंतर वडाळारोडने पथक पखालरोडवर दाखल झाले. येथील एक लहान धार्मिक स्थळ हटविल्यानंतर पथक काठेगल्लीमार्गे द्वारकेवर पोहचले. दुपारी दोन वाजता द्वारका येथे पथक धडकल्यानंतर पुणे महामार्गावरील नाशिकरोडकडून द्वारकेकडे येणारी वाहतूक काठेगल्ली सिग्नलवरून डावीकडे वळविण्यात आली होती.