मनपा शाळांमधील १९१ शिक्षकांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2016 10:38 PM2016-06-15T22:38:00+5:302016-06-15T22:57:41+5:30

परिणाम : स्थायी समिती सभापतींचे निवेदन

191 teachers' posts vacant in NMC schools vacant | मनपा शाळांमधील १९१ शिक्षकांची पदे रिक्त

मनपा शाळांमधील १९१ शिक्षकांची पदे रिक्त

Next

नाशिक : प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. मात्र, महापालिकेच्या शाळांमधील सुमारे १९१ शिक्षकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने शाळांतील शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत आहे. परिणामी मनपा शाळांची प्रतिमाही मलिन होत असल्याचा आरोप करत स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी सदर पदे त्वरित भरण्याची मागणी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात सलीम शेख यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे ३३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून बव्हंशी विद्यार्थी हे गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. सदर विद्यार्थ्यांना कायद्यानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मनपा शाळांमधील अनेक मुख्याध्यापकांसह शिक्षक हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात रिक्त पदांची संख्या वाढत आहे. मराठी माध्यमात मुख्याध्यापकांची ८२ पदे मंजूर असून त्यापैकी तीन पदे रिक्त आहेत, तर उपशिक्षकांची ६०७ पदे मंजूर असताना १०० पदे भरलेली नाहीत. पदवीधर शिक्षकांचीही ३१३ पदे मंजूर आहेत, तर ५२ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमातील मुख्याध्यापकांच्या मंजूर ११ पदांपैकी १, उपशिक्षकांच्या मंजूर ६४ पदांपैकी २२ तर पदवीधरांच्या मंजूर पदांपैकी सात पदे रिक्त आहेत.
हिंदी माध्यमातील उपशिक्षकांच्या मंजूर २६ पदांपैकी दोन, पदवीधरांच्या मंजूर १४ पदांपैकी चार पदे रिक्त आहेत. तीनही माध्यम मिळून एकूण १९१ पदे रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर पदे तत्काळ भरावीत व महापालिका शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सलीम शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 191 teachers' posts vacant in NMC schools vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.