सिन्नरला विज्ञान प्रदर्शनात १९६ विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:29 PM2020-02-14T18:29:44+5:302020-02-14T18:30:32+5:30
सिन्नर येथील सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरलेले विज्ञान प्रदर्शन-२०२० चे आयोजन विज्ञान शाखेमार्फत करण्यात आले होते. या प्रदर्शनात १९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सिन्नर : येथील सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरलेले विज्ञान प्रदर्शन-२०२० चे आयोजन विज्ञान शाखेमार्फत करण्यात आले होते. या प्रदर्शनात १९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सदर उपक्रमाचे प्रायोजक रसायनशास्त्र विभागातील सामंजस्य करार असलेले आॅलिंपस लॅबोरेटरिज प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली, ठाणे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य शिंदे यांनी सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्यांनीसुद्धा आपले प्रयोग उत्कृष्टपणे सादर केले. सदर उपक्रमास विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील एकूण ९५ प्रयोग सादर करण्यात आले होते. यात १९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, डॉ. एम. के. झटे, डॉ. पी. जे. तांबडे, प्रा. एस. टी. पेखळे, प्रा. के. एच. हुगाडे यांनी प्रयोगांचे अवलोकन केले.
सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, मविप्र संस्थेचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सिन्नर तालुका संचालक हेमंत नाना वाजे आदी मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्रीमती पवार यांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण ऐकत त्यांच्याशी सदर विषयांवर चर्चा केली व त्यांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांनी या विज्ञान प्रदर्शनाची तुलना पुणे विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या आविष्कार उपक्रमासोबत करून कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले.
विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन डॉ. एम. के. झटे, डॉ. पी. जे. तांबडे व प्रा. एच. ए. भदाणे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव व आॅलिंपस लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली, ठाणे यांचे संचालक आतिश रोडगे यांचे मार्गदर्शन लाभले.