तीन वर्षांत गुंतवणूक दुप्पट होणार असल्याचे सांगून २० लोकांना २ कोटींचा गंडा
By अझहर शेख | Published: April 18, 2024 05:49 PM2024-04-18T17:49:36+5:302024-04-18T17:50:25+5:30
शेअर मार्केटिंगचा असाही फंडा
अझहर शेख, नाशिक: शेअर मार्केटमधील गुतंवणूकीतून अधिक परतावा मिळवण्याच्या लालसेपोटी एका ठकसेनने चार वर्षांपूर्वी ३ ते १८ टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे वीस गुंतवणूकदारांना २ कोटी ८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाविस्कर एंटरप्राइजेस फर्मचा संचालक मुख्य संशयित आरोपी पंकज प्रभाकर बाविस्कर यास आर्थिक गुन्हे शाखेने अलगद बेड्या ठोकल्या.
२०१६- २०२१साली पंकज हा शेअर मार्केटींगमध्ये पैसे लावून कमाई करत हाेता. मात्र, कराेनाचा हाहाकार माजल्यावर त्याला शेअर मार्केटमध्ये ताेटा झाला. तत्पूर्वीच काही नागरिकांनी त्याच्या डी मॅट अकाउंट आणि ओळखीमुळे लाखाे रुपयांची गुतंवणूक त्याच्याकडे केली हाेती. मात्र, ताेटा झाल्याने ताे लाेकांना पैसे देण्यास असमर्थ ठरला. दरम्यान, ज्योती राजेश दायमा(रा. अश्विननगर, नवीन सिडको) यांच्या फिर्यादीनुसार पंकज याने या कालावधीत बाविस्कर एंटरप्रायजेस कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास तीन वर्षात गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट होईल व न झाल्यास १८ टक्के परतावा देण्यात येईल अशी हमी गुंतवणुकदारांना हमी दिली. त्यानंतर अनेकांकडून राेख ठेवी स्विकारल्या. मोबदला न देता १५ हून अधिक गुंतवणुकदारांच्या दोन कोटी आठ लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार करून फसवणुक केली.
गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव करत आहेत. शहर व जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणचे सर्व सामान्यांनी बाविस्कर एन्टरप्रायजेस या कंपनीत गुंतवणुक केली असल्यास आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक शहर येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रशांत बच्छाव यांनी केले आहे. दरम्यान, बाविस्कर याला न्यायालयाने पाेलीस काेठडी सुनावली आहे.