कागदावर पाहिल्या सूर्यग्रहणाच्या १२५ प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:11 AM2019-12-27T00:11:12+5:302019-12-27T00:12:11+5:30
सूर्यग्रहण पाहताना उघड्या डोळ्यांनी बघू नये अशी पालकांची कडक आणि वारंवार केलेली सूचना, पण सूर्यग्रहण बघण्याची दांडगी हौस. अशा परिस्थितीत आगळा वेगळा मार्ग कल्पकतेने शोधून काढत निफाड येथील विज्ञानप्रेमी दोन भावंडांनी एक-दोन नव्हे तर तब्बल एकशे पंचवीस सूर्यग्रहणाच्या प्रतिमा एकाच वेळेस बघण्याचा आनंद आपल्या कल्पक प्रयोगशीलतेमधून लुटला.
निफाड : सूर्यग्रहण पाहताना उघड्या डोळ्यांनी बघू नये अशी पालकांची कडक आणि वारंवार केलेली सूचना, पण सूर्यग्रहण बघण्याची दांडगी हौस. अशा परिस्थितीत आगळा वेगळा मार्ग कल्पकतेने शोधून काढत निफाड येथील विज्ञानप्रेमी दोन भावंडांनी एक-दोन नव्हे तर तब्बल एकशे पंचवीस सूर्यग्रहणाच्या प्रतिमा एकाच वेळेस बघण्याचा आनंद आपल्या कल्पक प्रयोगशीलतेमधून लुटला.
या दशकातले सर्वात शेवटचे सूर्यग्रहण बघण्याचे भाग्य ढगाळ हवामानामुळे मिळते की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आठ वाजता ग्रहणाला प्रारंभ झाला, मात्र साडेनऊ वाजेपर्यंतदेखील आकाशात ढगांनी सूर्याला झाकून ठेवले असल्याने ग्रहण दिसू शकत नव्हते. त्यानंतर ढगांची गर्दी थोडीफार विरळ होऊ लागल्याने सूर्यग्रहण बघण्याची संधी लोकांना लाभली.
निफाडचे मूळ रहिवासी व पिंपळगाव बसवंत येथील के.के. वाघ विज्ञान महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयात एम.एस्सी. करणाऱ्या प्रतीक्षा श्रीवास्तव आणि निफाड येथील वैनतेय महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावीच्या वर्गात शिकणाºया आकाश श्रीवास्तव या दोघा बहीण-भावांनी सूर्यग्रहण बघण्यासाठी अनोख्या पद्धतीने सूर्यग्रहण बघितले.
निफाडच्या बहीण-भावाची अनोखी कल्पकता !
घरातील किचनमधील चाळणी आणि एक पांढरा कागद त्यांनी घेतला. ज्यावेळी सूर्यग्रहण दिसायला लागले त्यावेळी सूर्यग्रहणाच्या मार्गात त्यांनी चाळणी धरली आणि चाळणीच्या खाली काही अंतरावर पांढरा कागद पकडत चक्क डोळ्यांना कसल्याही प्रकारे इजा होऊ न देता एक दोन नव्हे तर तब्बल १२५ सूर्यग्रहणाच्या प्रतिमा या कागदावर बघण्याचा आनंद दोघा बहीण- भावांनी लुटला. चष्म्याला असलेल्या बहिर्गोल भिंगाद्वारे सूर्यबिंबाची सुस्पष्ट प्रतिमा कागदावर घेऊन सूर्यग्रहण बघता येते हे दाखवून दिले.