नर्सरीतील २ लाख ६५ हजार रोपे पाण्याच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 07:38 PM2019-06-22T19:38:06+5:302019-06-22T19:40:39+5:30
खर्डे : येथे वन विभागाच्यावतीने नर्सरी तयार करण्यात आली असून, नर्सरीत जवळपास २ लाख ६५ हजार रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत.
खर्डे : येथे वन विभागाच्यावतीने नर्सरी तयार करण्यात आली असून, नर्सरीत जवळपास २ लाख ६५ हजार रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत. या नर्सरीत करंज, आवळा, बोर, बांबू, रामकाठी, कांचन, गुलमोहर, चिंच, बेडा, रेनट्री, शेवगा, हातगा, तुती, अंजन, शिवण, शिसव, पळस, खैर, पापडी आदी जातींच्या रोपांचा समावेश आहे. खर्डे परिसरात भीषण पाणी टंचाई असतांना देखील येथील शेतकरी राजाराम आहिरे यांच्या शेतात वनविभागाने कूपनलिकेच्या तसेच ट्रँकरच्या पाण्यावर नर्सरीत विविध जंगली जातीचे रोपे लागवडीसाठी उत्कृष्ट पद्धतीने टवटवीत तयार झाले आहेत.
यावर्षी खर्डे परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. खर्डे ग्रामपंचायतीची वार्शी धरणालगत असलेली उद्धभव विहिरीने तळ गाठल्याने लगतची विहीर अधिग्रहित करून येथे आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणत पाणी टंचाई असताना देखील वन विभागाने या ठिकाणी नर्सरी तयार करून रोपे लागवडी योग्य केली आहेत. तसेच नर्सरीतील रोपांची लागवड करण्यासाठी वनपरिक्षेत्रातील शेरी, वाजगांव, वार्शी, हनुमंतपाडा व कांचणे येथे खड्डे देखील खोदून ठेवली आहेत. शासनाच्या वतीने दरवर्षी प्रत्येक ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीचे उदिष्टय दिले जात असून, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते.
मात्र त्याचे संगोपन पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने त्याची आकडेवारी फक्त कागदावर राहते. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यासाठी वृक्ष जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. जून मिहना संपत आला तरी देखील पावसाचे चिन्ह दिसत नसल्याने ग्रामीण भागात मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यात नर्सरीतील तयार रोपे पाण्याअभावी जगवणे वनविभागाला देखील आता जिकरीचे झाले असून, लवकर पाऊस पडावा यासाठी सर्वजण प्रतीक्षा करीत आहेत. खर्डे येथील नर्सरीतील रोपे लागवडी योग्य झाले असून, पाऊस पडत नसल्याने आहे त्या पाण्यावर ते जगविण्यासाठी वनविभागाचे वनपाल पी. पी. सोमवंशी, वनरक्षक राहुल बच्छाव आदींसह वनसेवक, कर्मचारी परिश्रम घेतांना दिसत आहे.
(फोटो २२ खर्डे)
खर्डे, ता. देवळा येथे वनविभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नर्सरीत टवटवीत दिसत असलेली रोपे .