हतगड शिवारातून २७ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 05:10 PM2019-10-14T17:10:28+5:302019-10-14T17:12:31+5:30
चक्क पंजाब राज्यात निर्मित करण्यात आलेल्या व अरुणाचल प्रदेश या एकमेव राज्यात विक्रीस परवानगी असलेले मद्य आढळून आले.
नाशिक : पंजाब राज्यात निर्मित केलेला व केवळ अरुणाचल प्रदेश व चंदीगढ केंद्रशासित प्रदेशात विक्रीस परवानगी असलेल्या मद्याची महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांत निवडणूक कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने हतगड शिवार येथील सावमाळ गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात दडवून ठेवलेला २७ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा विभागीय भरारी पथकाने छापा मारून हस्तगत केला.
विधानसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर जिल्ह्यात वाढला असून, शहर व ग्रामीण भागात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून प्रचारावर भर दिला जात आहे. दरम्यान, ओल्या पार्ट्या रंगण्याची शक्यता लक्षात घेत राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. विभागीय भरारी पथक ाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.१३) सुरगाणा तालुक्यातील हतगड शिवार येथील सावळमाळ गावातील बांधकामस्थितीत असलेल्या इमारतीत छापा मारला. यावेळी पथकाच्या हाती मद्यसाठ्याचे मोठे घबाड लागले. यामध्ये चक्क पंजाब राज्यात निर्मित करण्यात आलेल्या व अरुणाचल प्रदेश या एकमेव राज्यात विक्रीस परवानगी असलेले मद्य आढळून आले. यावेळी निरीक्षक आर. एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, एस. एस. रावते, लोकेश गायकवाड, दीपक आव्हाड, रामकृष्ण झनकर आदींच्या पथकाने झडतीसत्र राबविले. या कारवाईत एकूण २६ लाख ७१ हजार ५६० रुपये किमतीचे मद्याचे अवैधरीत्या साठा करून ठेवलेले सुमारे ५७३ खोके उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहेत. या प्रकरणी सुनील लक्ष्मण खंबायत (२१, रा. हतगड) यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मद्यसाठा पुरवठादार व विकत घेणाऱ्या मूळ विक्रेत्याचा पथकाद्वारे शोध घेतला जात आहे.
असा आहे मद्यसाठा
१८० मी.लिच्या ब्ल्यू व्हिस्कीच्या १४ हजार ११२ सीलबंद बाटल्यांचे २९४ खोके जप्त केले आहेत. हे मद्य केवळ अरुणाचल प्रदेशमध्ये विक्रीस परवानगी आहे. त्याची किंमत अंदाजे १८ लाख ३४ हजार ५६० रुपये इतकी असल्याचे पथकाने सांगितले.
चंदीगढ राज्यात विक्रीसाठी असलेला जिन्सबर्ग प्रीमियम स्ट्रॉँग बियरच्या ५०० मी.लिचे ६ हजार ६९६ सीलबंद टीनचे सुमारे २७९ खोके पथकाने हस्तगत केले आहेत. त्याची किंमत सुमारे ८ लाख ३७ हजार रुपये इतकी आहे.