दारू पिण्यासाठी ५७ वर्षाच्या मुलाने ८२वर्षीय आईचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 06:16 PM2019-07-23T18:16:06+5:302019-07-23T18:18:47+5:30
नशेची हौस भागविण्यासाठी आपल्या वृध्द आईकडे पैसे मागितले, आईने पैसे दिले नाही, म्हणून घराच्याच भींतीवर जन्मदात्रीचे डोके आपटले. त्यात ८२ वर्षीय कांताबाई शिवलाल काळे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातपूर भागात
नाशिक : ज्या स्त्रीला मातृत्व लाभते ती आई बनते आणि जगातील सर्वश्रेष्ठ असे नाते त्या स्त्रीला मिळते. नऊ महिने पोटात वाढवून जन्माला घातलेल्या बाळाला लहानाचे मोठे करताना आई त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. त्यासाठी तिने उपसलेले कष्ट हे तिलाच ठाऊक असते म्हणून कवी यशवंत यांनी आईची महती सांगताना ‘स्वामी तीन्ही जगाचा आई विना भिकारी...’ असे म्हटले आहे. मातृत्वाच्या नात्याचा विसर उतारवयाकडे असलेल्या नशेबाज मुलाला पडला अन् त्याने नशेची हौस भागविण्यासाठी आपल्या वृध्द आईकडे पैसे मागितले, आईने पैसे दिले नाही, म्हणून घराच्याच भींतीवर जन्मदात्रीचे डोके आपटले. त्यात ८२ वर्षीय कांताबाई शिवलाल काळे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातपूर भागात घडल्याचे उघडकीस आले आहे.
सातपूर भागात कांताबाई काळे हे त्यांच्या दादासाहेब गायकवाड सोसायटीत राहत होत्या. यावेळी त्यांचा मुलगा संशयित कमलाकर शिवलाल काळे (५७,रा मोरे मळा, नाशिकरोड), याने कांताबाई यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांचा तगादा लावला. आईने नकार दिला असता या क्रूरकर्म्या मुलाने वृध्द आईला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी संशयित कमलाकर याने आईचे डोके धरून भींतीवर आपटले. त्यामुळे डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्या बेशुध्द पडल्या. त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२३) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित कमलाकर यास दुपारी अटक केली असून प्राणघातक हल्ल्याची नोंद आता खूनात रूपांतरीत झाली. पोलिसांनी त्याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास बुधवारी (दि.२३) न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक एस.डी.चव्हाण करीत आहेत.
---
दारूने जीवनाची केली वाताहत
कमलाकर हा काही वर्षांपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात चालक होता. व्यसनामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली आणि त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली. कमलाकर याने दारूपायी आपल्या वृध्द आईवरदेखील हल्ला चढवून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली आहे.