नाशिकची 20 धरणे भरली; आता पाण्याची चिंता मिटली; जिल्ह्यात ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा
By अझहर शेख | Published: September 12, 2023 04:25 PM2023-09-12T16:25:58+5:302023-09-12T16:26:16+5:30
९०.४८टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असून २३पैकी २१ धरणांची पाणी पातळी ९०टक्क्यापर्यंत पोहचली आहे. यामध्ये पाच धरणे तर शंभर टक्के भरली आहेत.
नाशिक : जिल्ह्याला महिनाभरापासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम होती. गेल्या शुक्रवारी (दि.८) शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने मोठा दिलासा नाशिककरांना मिळाला आहे. धरणांची खालावलेली पाणीपातळीतही वाढ झाली आणि सरींच्या वर्षावाने सरासरी ओलांडली. जिल्ह्यात आता ९०.४८टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असून २३पैकी २१ धरणांची पाणी पातळी ९०टक्क्यापर्यंत पोहचली आहे. यामध्ये पाच धरणे तर शंभर टक्के भरली आहेत.
नाशिक शहरात शुक्रवारी ६३ तर जिल्ह्यात ५२ मिमी इतका पाऊस पडला. जिल्ह्यात सर्वाधिक कळवण तालुक्यामध्ये १२१ मिमी तर त्र्यंबकेश्वरमध्ये ९९, पेठमध्ये ९२ तर दिंडोरीत ८८ सुरगाणा तालुक्यात ८२ आणि इगतपुरीमध्ये ७१ मिमी इतका पाऊस त्यादिवशी मोजण्यात आला होता. कळवण, दिंडोरीसह निफाड, चांदवड, येवला या तालुक्यांमध्येही समाधान पाऊस झाला. मालेगाव, नांदगाव या दोन तालुक्यांमध्ये मात्र त्यादिवशीही पावसाने निराशा केली. शुक्रवारच्या पावसाने नाशिक जिल्ह्यावरील दुष्काळसदृश्य परिस्थितीचे दाटून येणारे ढग दूर केले. यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजा आणि प्रजेच्या आशा पल्लवित झाल्या आहे. गोदावरीसह जिल्ह्यातील अन्य नद्याही त्यादिवशी दुथडी भरून वाहताना नाशिककरांनी बघितल्या. या हंगामात पहिल्यांदाच असे चित्र नजरेस पडले. सध्यस्थित नाशिकच्या धरणांमध्ये एकुण उपयुक्त जलसाठा ४५ हजार ६७२ दशलघफु इतका आहे. मागील वर्षी १२ सप्टेंबर रोजी ४९ हजार ४४६ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा धरणांमध्ये होता. ३ हजार ७७४ दलघफूटाने पाणीसाठा त्या तुलनेत अद्यापही कमी आहे.
पावसाची पुन्हा दडी
हवामान खात्याने शुक्रवारी ‘ऑरेंज’ तर शनिवारी ‘यलो’ अलर्ट दर्शविला होता. यानुसार पावसाने शुक्रवारी जोरदार ‘बॅटींग’ करत दमदार पुनरागमन केले खरे; मात्र रविवारपासून पुन्हा दडी मारली आहे. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र कडक ऊन तीन दिवसांपासून पडू लागले आहे. यामुळे पावसाने पुन्हा ओढ दिल्याची आता चर्चा होऊ लागली आहे.