नाशिक जिल्ह्यात २० लाखांचे मांडूळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:11+5:302021-01-03T04:16:11+5:30
नाशिक : मालेगाव -नामपूर रस्त्यावर भोसले पेट्रोल पंपासमोर मांडूळाची तस्करी करून विक्रीच्या हेतूने वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना अपर पोलीस ...
नाशिक : मालेगाव -नामपूर रस्त्यावर भोसले पेट्रोल पंपासमोर मांडूळाची तस्करी करून विक्रीच्या हेतूने वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचे मांडूळ, १ लाख रुपयांचे वाहन, १२ हजारांचे भ्रमणध्वनी,५०० रुपयांची बॅग, २ हजार ६० रुपये रोख असा २१ लाख १४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कॅम्प भागात तिघे जण मांडूळ विक्रीसाठी येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, पोलीस हवालदार भूषण खैरनार, संदीप राठोड, पंकज भोये, प्रकाश बनकर आदींनी सापळा रचला. भोसले पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या वाहनाची (क्रमांक-जेजी ०६ बीएल २६७५) तपासणी केली असता वाहनात २० लाख रुपये किमतीचे जिवंत मांडूळ आढळून आले. पथकाने रंजेश गुलाबचंद चव्हाण(३०), सावन देवराज चव्हाण(३०), विनिताबाई गुलाबचंद चव्हाण रा. जामदे, तालुका साक्री, जि. धुळे या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच मांडूळ व औषधी पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास कॅम्प पोलीस करीत आहेत.
फोटो मेलवर पाठविला आहे.....मालेगाव मांडुूळ या नावाने