आडवाडी घाटात बस अपघातात २० शालेय विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 05:04 PM2019-07-04T17:04:01+5:302019-07-04T17:04:15+5:30
नाशिक जवळील घटना : चालकाने दाखवले प्रसंगावधान
नाशिक : सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी घाटात एसटीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात होऊन २० शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला नेल्याने मोठी दुर्घटना टळली.
सिन्नर-आडवाडी बस (क्रमांक एमएच १४ बीटी ०४८३) ही आडवाडीवरु न शाळकरी मुले घेऊन साडेदहाच्या सुमारास ठाणगावकडे रवाना झाली होती. बस आडवाडी घाट पास करु न खाली उताराला लागली असता बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालक भाऊसाहेब गायधनी यांच्या लक्षात आली. त्यांनी बसवर कसेबसे नियंत्रण मिळवत बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डोंगरकपारीकडे नेली व गाडीतील ८० प्रवाशी विद्यार्थ्यांचा जीव वाचला. बस अचानक कडेला धडकल्याने बसमधील सगळे प्रवासी एकमेकांवर आदळले. त्यात अनेकाचे डोक तर अनेकाचे दात पडले आहे. या अपघातात पायल दत्तू गांजवे (१३) सोनाली रामनाथ सद्गीर (१४) साक्षी बाबूराव बिन्नर (१४) मोहिनी बिन्नर, आरती बिन्नर, अलका बिन्नर, सुचित्रा कोकाटे,राणी बिन्नर, सोनाली बिन्नर, शैला बिन्नर, वैभव गांजवे, समाधान मोखरे, योगेश बिन्नर, अमोल बिन्नर, सचिन बिन्नर, शुभम गांजवे, वैभव बिन्नर , बाबुराव गांजवे हे प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले .
चालक गायधनींचे कौतुक
अपघातात बसचे चालक भाऊसाहेब गायधनी यांनी प्रसंगावधान राखल्याने प्रवाशांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. आडवाडी घाटात गाडीचे ब्रेक निकामी झाले असल्याचे गायधनी यांच्या लक्षात आले मात्र त्यांनी गियरच्या साहाय्याने घाट पास करून गाडीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. पण घाट संपताच पुढे सर्वत्र उतार असल्याने त्यांनी गाडी डाव्या बाजूला डोंगराच्या कडेला धडकवली त्यामुळे जीवित हानी झाली नाही. गायधनी यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.