२० तोळे दागिन्यांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2016 11:50 PM2016-03-02T23:50:12+5:302016-03-02T23:52:31+5:30
फेब्रुवारीत चेनस्नॅचिंगच्या आठ घटना : सातपूर, गंगापूर, इंदिरानगर लक्ष्य
नाशिक : पायी जाणाऱ्या, दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांना लक्ष्य बनवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची पोत खेचून नेल्याच्या घटना रोखण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे चित्र असून, फेब्रुवारीमध्ये चेनस्नॅचिंगच्या आठ, तर तोतया पोलिसांनी लूट केल्याची एक घटना घडली आहे़ चेनस्नॅचिंगच्या या घटना प्रामुख्याने गंगापूर, सातपूर व इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या असून, या हद्दीतील पोलीस पेट्रोलिंग, गुन्हे शोध पथक यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेणाऱ्या संशयितांनी काळ्या रंगाचा दुचाकीचा वापर केल्याचे तसेच पायी व दुचाकीवर जाणाऱ्या महिलांना लक्ष्य केल्याचे दिसून येते़ दुचाकीवरील दोघांपैकी एक जण पत्ता विचारण्याचा बहाणा करतो, तर दुसरा महिलेचे लक्ष नसल्याचे बघून गळ्यातील मंगळसूत्र वा साखळी खेचतो़ फेब्रुवारीतील चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये गंगापूर, सातपूर व इंदिरानगरमध्ये प्रत्येकी दोन घटना घडल्या असून, सरकारवाडा व मुंबई नाका परिसरात एक घटना घडली आहे़
फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात तीन व दुसऱ्या पंधरवाड्यात पाच चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या़ २७ ते २९ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत चार घटना घडल्या असून, यामध्ये गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत सलग दोन दिवस चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत़
पोलीस आयुक्तालयातर्फे २८ तारखेला अर्धमॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते़ या मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोल्फ क्लब मैदानावर तैनात करण्यात आले होते़, तर दुसऱ्या दिवशी हे सर्व श्रमपरिहारासाठी गेल्याने या चोरट्यांनी संधीचा फायदा घेतल्याचे दिसून येते़ (प्रतिनिधी)