पंचवटीसह २० रेल्वेगाड्या १० मेपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:52+5:302021-04-27T04:15:52+5:30
नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० ...
नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० मेपर्यंत रद्द केल्या आहेत.
पंचवटीने दररोज मुंबई, ठाण्याला कामानिमित्त व व्यवसायानिमित्त दररोज नाशिकहून शेकडो जण जातात. परंतु राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवेची आस्थापनावगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयातदेखील उपस्थितीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसची गर्दी कमी झाली आहे. पंचवटीप्रमाणेच राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या रेल्वेनादेखील गर्दी कमी झाल्याने रेल्वे प्रशासनाने १० मेपर्यंत या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नंदीग्राम मात्र सुरू राहणार आहे.
नागपूर-पुणे गरीबरथ, नागपूर-मुंबई दुरांतो या गाड्या नाशिकला थांबत नसल्यातरी त्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे-नागपूर, मुंबई-नागपूर, मुंबई-अमरावती, मुंबई-जालना या मुंबईला जाणाऱ्या व परत येणाऱ्या गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनपासून पंचवटी व अन्य इंटरसिटी ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्पेशल ट्रेनच्या नावाने सुरू झाल्या. तथापी, सुरू झाल्यापासूनच पंचवटीला प्रतिसाद खूप कमी प्रमाणात मिळत होता. स्पेशल ट्रेनमुळे या गाडीचे भाडेही वाढले होते तसेच आरक्षण करावे लागत असल्याने प्रवासी, पासधारक वैतागले आहेत. गाडी येण्याआधी ९० मिनिटे यावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी कसारा लोकल, खासगी वाहनांनी मुंबई गाठणे पसंत केले आहे. त्यामुळे गाडीचा प्रतिसाद कमी झाला आहे.