२० हजार पक्ष्यांचे आगमन; नांदूरमधमेश्वर अभयारण्यात किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 05:21 PM2018-10-01T17:21:08+5:302018-10-01T17:24:19+5:30
नाशिक : दरवर्षी नाशिकमधील निफाड येथील चापडगाव शिवारातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात गुलाबी थंडी जाणवू लागताच होताच स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते; मात्र यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने नांदूरमधमेश्वर अभयारण्यात किलबिलाट ऐकू येऊ लागला आहे. पक्षी प्रगणनेअंतर्गत विविध प्रजातीच्या सुमारे २० हजार ६९१ पक्ष्यांचा अभयारण्यामधील पाणथळ व गवताळ जागेत अधिवास आढळून आल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अभयारण्य परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे यावर्षी लवकरच गजबजले. त्यामुळे वन्यजीव नांदूरमधमेश्वर अभयारण्य कार्यालयाच्या वतीने नुकतीच पक्षी प्रगणना विविध पक्षिमित्र व वन्यजीव अभ्यासकांच्या मदतीने वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. याअंतर्गत जलाशयाच्या पाणथळ जागेत १९ हजार ४०५, तर परिसरातील गवताळ प्रदेशात तसेच वृक्षराजीवर एक हजार २८६ असे एकूण २० हजार ६९१ पक्ष्यांची मोजदाद करण्यास यश आले. दुर्बिणी, टेलिस्कोपच्या सहाय्याने अभयारण्यक्षेत्रातील विविध निरीक्षण मनो-यांवरून पक्षिमित्रांनी गणना पूर्ण केली. जलाशयाच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, भरपूर खाद्य उपलब्ध असल्यामुळे पक्ष्यांच्या आगमनाला गती मिळाली आहे. आॅक्टोबरच्या पंधरवड्यापर्यंत अभयारण्य पूर्णपणे विविध देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांनी गजबजलेले पहावयास मिळणार आहें.