२०० पैकी दिले २०५ गुण

By admin | Published: September 17, 2016 12:39 AM2016-09-17T00:39:19+5:302016-09-17T00:40:21+5:30

आरोग्य विद्यापीठाचा घोळ : सारवासारव करण्यासाठी यंत्रणेची धावपळ

205 points out of 200 | २०० पैकी दिले २०५ गुण

२०० पैकी दिले २०५ गुण

Next

संदीप भालेराव  नाशिक
आरोग्य विद्यापीठातील परीक्षा विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केल्यामुळे परीक्षा आणि निकाल यात कोणताही गोंधळ होत नसल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विद्यापीठाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला चक्क २०० गुणांपैकी २०५ गुण बहाल करण्याचा पराक्रम विद्यापीठाने केला असून लेखी परीक्षेतही संबंधित विद्यार्थ्याला १०० पैकी १२४ गुण देण्याची किमया विद्यापीठाने केली आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सध्याचे कामकाज अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध होत असल्याचे वारंवार सांगण्यात येते. विशेषत: परीक्षा विभागाने अनेक बदल करीत परीक्षा आणि निकाल यंत्रणेतील त्रुटी दूर करून बिनचूक कामकाज सुरू केल्याचा छातीठोक दावा परीक्षा नियंत्रकांकडून वारंवार केला जातो; मात्र एमबीबीएस प्रथम वर्ष निकालातील एका गुणपत्रकामुळे परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. मुंबईतील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला बायो केमेस्ट्री या विषयात २०० पैकी २०५ गुण गुणपत्रिकेत दर्शविण्यात आले आहेत. शिवाय लेखी परीक्षेतही संबंधित विद्यार्थ्याला १०० पैकी चक्क १२४ गुण देऊन विद्यापीठाने कळसच केला आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सदर बाब संबंधित विद्यार्थ्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने विद्यापीठाकडे त्याबाबतची तक्रार केल्यानंतर विद्यापीठ खडबडून जागे झाले. विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर संबंधितांनी दुरुस्ती करून त्यास सुधारित गुणपत्रक बहाल केले; मात्र या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये, अशी तंबीच संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयादेखील दिल्याचे समजते.
सुधारित गुणपत्रकामध्ये विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १०० पैकी ७५ आणि एकूण गुण दोनशे पैकी १५६ गुण देण्यात येऊन दुरुस्ती करण्यात आली; मात्र हा सर्व अनागोंदी प्रकार केवळ एका विद्यार्थ्याच्या बाबतीत नसून काही विद्यार्थ्यांच्या निकालातही असा प्रकार घडल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे.
विद्यापीठाच्या वरिष्ठांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना या प्रकरणाविषयी चर्चा न करण्याचे फर्मान सोडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यंत्रणेतील सुधारणेबाबत कितीही दावे केले जात असले तरी परीक्षेतील गोंधळाचे प्रकार सुरूच असून प्रॅक्टिकल्सच्या गुणांचा घोळ आणि परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याबाबत विद्यापीठाला अद्यापही यश आलेले नाही.

Web Title: 205 points out of 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.