आरटीई प्रवेशासाठी २१९२ अर्ज दाखल
By admin | Published: February 10, 2017 10:56 PM2017-02-10T22:56:52+5:302017-02-10T22:57:07+5:30
२०३ शाळांमध्ये हवे प्रवेश
नाशिक : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांच्या पाल्यांसाठी राखीव २५ टक्के जागांसाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज मागविले जात आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील २०३ शाळांमध्ये ३५६० जागांसाठी दोन हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. जिल्ह्यातील एकूण ४५७ शाळांमध्ये ६२४८ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाइन अर्ज मागविण्यात आल्यची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (राइट टू एज्युकेशन) आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना पहिली किंवा पूर्व प्राथमिकसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. या जागांवर एप्रिलपूर्वी प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबविली जाते.
शहरातील इंग्रजी माध्यमाच्या २०३ शाळांमधील ३५६० राखीव जागांसाठी २१९२ आॅनलाइन अर्ज आले आहेत. त्यात पहिली व ज्युनिअर केजीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
या अर्जामध्ये सर्वसाधारण गटातील ३२७, इतर मागासप्रवर्ग-६८७, भटके जाती-जमाती - ३२ यांसह अर्ज प्राप्त झाले आहेत. २४ फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज मागविण्यात आले आहेत. आलेल्या अर्जांच्या आधारे २७ किंवा २८ फेब्रुवारीला सोडत काढण्यात येईल. विद्यार्थ्यांनी १ ते ९ मार्चदरम्यान शाळांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागेल. त्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांसाठी १४ मार्चला दुसरी सोडत काढण्यात येईल. (प्रतिनिधी)