रस्त्यांची २१ कोटींची कामे रद्द नाहीत
By admin | Published: June 23, 2017 04:41 PM2017-06-23T16:41:17+5:302017-06-23T16:41:17+5:30
विष्णू सावरांची सारवासारव:निधी नियमानुसारच वापरण्यासाठी आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या रस्त्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या २१ कोटींच्या रस्त्यांची कामे रद्द केलेली किंवा स्थगित केलेली नाहीत. फक्त हा निधी नियमानुसारच खर्च होतो आहे किंवा काय, याची तपासणी करण्याचे पत्र जिल्हा परिषदेला दिल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली.
जिल्हा परिषदेला महिन्याभरापूर्वीच जिल्हा नियोजन मंडळाकडून २१ कोटींचा निधी रस्ते व पुलांच्या कामांसाठी वितरित करण्यात आला होता. या २१ कोटींच्या कामांना परस्पर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देण्यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत व सर्वसाधारण सभेत भाजपाचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे व राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तसेच दोन दिवसांपूर्वीच ही कामे रद्द करण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती. तसा दावाही उदय जाधव यांनी केला होता. या रस्ते मंजुरीच्या कामात घोळ असून, अनेक कामांना ग्रामीण मार्गाचे क्रमांकच नसल्याचे त्यांचे म्हणणे होेते. आता प्रत्यक्षात आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीच या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही किंवा संबंधित कामे रद्दही केलेली नसल्याचे सांगितले; मात्र ज्या कामासाठी निधी दिला, तीच कामे या निधीतून होत आहेत की नाही, कामे मंजूर करताना शासनाचे नियम-निकष पाळले गेले आहेत काय, हे तपासून पाहण्यासाठी संबंधित पत्र जिल्हा परिषदेला दिल्याचे विष्णू सावरा यांनी सांगितले.