शेतकरी आंदोलनासाठी २१ सदस्यीय सुकाणू समिती
By admin | Published: June 6, 2017 03:03 AM2017-06-06T03:03:21+5:302017-06-06T03:03:31+5:30
नाशिकच्या शेतकऱ्यांनी रविवारी राज्यस्तरीय बैठक घेऊन शेतकरी संपात समन्वय राखण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणतांबे येथील शेतकऱ्यांसोबत मध्यरात्री बैठक घेऊन शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत नाशिकच्या शेतकऱ्यांनी रविवारी राज्यस्तरीय बैठक घेऊन शेतकरी संपात समन्वय राखण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली आहे. ही समिती सोमवारी झालेल्या राज्य भरातील आंदोलनाचा आढावा घेऊन मंगळवारी (दि.६) बैठक घेणार असून, शेतकरी संपाची पुढील दिशा ठरविण्याचे नियोजन करणार आहे.
पुणतांबे येथील जयाजी सूर्यवंशी व धनंजय जाधव यांनी यांनी संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शेतकरी संपात फूट पडल्याच्या बातम्या पेरल्या गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, शेतकरी संपात कोणतीही फूट पडली नसून राज्यातील शेतकरी अधिक आक्रमक होऊन संपात सहभागी झाला आहे. मात्र झालेल्या प्रकारामुळे कोणीही शेतकऱ्यांना आंधारात ठेवून अशा प्रकारे निर्णय घेऊन नये यासाठी नाशिकमधील बैठकीत सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती संपाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समन्वयाचे काम करणार आहे. शेतीप्रश्नांना देशस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची ही नवी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये २१ जणांची नावे आहेत.
सुकाणू समिती संदर्भात शेती अर्थतज्ज्ञ डॉ. गिरधर पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, शेतकरी आंदोलनाची फेरआखणी होणार आहे. राजकीय पक्षांना दूर केल्याने हिंसात्मक आंदोलन थांबले आणि अहिंसात्मक प्रभावी आंदोलन सुरू झाले आहे. राज्यभरातील नव्या सदस्यांसह सुकाणू समिती स्थापन झाली असून, या समितीमध्ये अजूनही काही राज्यभरांतील सदस्यांची नावे वाढणार आहे. ही समिती शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.