नाशिक शहरात ऑक्सिजनचे २१ प्रकल्प पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:15 AM2021-09-11T04:15:24+5:302021-09-11T04:15:24+5:30

नाशिक महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या दोन लाटांचा अनुभव लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या ...

21 Oxygen projects completed in Nashik city | नाशिक शहरात ऑक्सिजनचे २१ प्रकल्प पूर्ण

नाशिक शहरात ऑक्सिजनचे २१ प्रकल्प पूर्ण

Next

नाशिक महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या दोन लाटांचा अनुभव लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला होता. अनेक रुग्णांना तर ऑक्सिजन बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शासनानेदेखील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाचपट अधिक असेल असे गृहीत धरून नियोजन करण्यास सांगितले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. महापालिकेची रुग्णालये आणि कोविड सेंटर्समध्येदेखील ऑक्सिजन प्लांटचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पन्नास बेडपेक्षा अधिक बेड असणाऱ्या रुग्णालयांनादेखील ऑक्सिजन प्लांट उभारण्याची सक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरात २१ पीएसए प्लांट उभारण्यात आले आहेत. यात नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बिटको रुग्णालयात दोन प्लांट तयार करण्यात आले आहेत. यात मीनाताई ठाकरे कोविड सेंटर, संभाजी स्टेडियममध्ये दोन, जिल्हा शासकीय रुग्णालय दोन, अंबड आयटी कोविड सेंटर तसेच ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी तीन तसेच सुश्रूत रुग्णालय, रसिकलाल धाडीवाल आणि गंगा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात प्रत्येकी एक या प्रमाणे ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये प्लांट बसवल्याने त्याची विद्युत, बांधकाम आणि अन्य विभागांनी तातडीने तपासणी करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.

अर्थात, एकीकडे तिसऱ्या लाटेची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र नाशिक महापालिकेने हंगामी कामगारांना कमी केले आहे. यापूर्वी कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असतानाच भरतीचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने मुलाखतीदेखील घेतल्या होत्या, नंतर मात्र आता मुदत संपलेल्यांनाच सेवामुक्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

इन्फो...

नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट नसल्याने वैद्यकीय उपकरणांचा उपयोग होत नव्हता. मात्र नंतर दोन रेडिओलॉजिस्ट मानधनावर भरण्यात आले होते. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने यातील एकाला आता सुटी देण्यात येणार आहे तसे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title: 21 Oxygen projects completed in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.