प्रगटदिनानिमित्त रंगली २१ तबलावादकाची जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:57 PM2018-02-07T18:57:17+5:302018-02-07T18:57:27+5:30
नाशिक: उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे बुधवारी (दि. ७) श्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त २१ तबलावादकांच्या जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम भाविकांनी अनुभवला. नाशिक शहरात पहिल्यांदाच अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उंटवाडी परिसरात झालेल्या या कार्यक्रमात विविध वयोगटातील २१ तबलावादकांनी त्रितालातील कायदे, तुकडे, ताल दादरा हे राग तबल्यावर सादर केले. गुरुवंदना परण व गणपतीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. रत्नाकर संत गुरुजींनी गजानन महाराजांची सायंकाळची आरती सादर केल्यानंतर तिलाही तबल्यावर साथ दिली. शहरातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गजानन महाराज सेवा परिवार दरवर्षी अशा स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करत आले आहे. दिगंबर सोनवणे, रसिक कुलकर्णी यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमास ‘अंर्तनाद’ असे नाव देण्यात आले होते. भाविकांनी टाळ्यांच्या गजरात सुरेल अशा सादरीकरणाला दाद दिली.
दरम्यान प्रगटदिनानिमित्त सकाळपासून भाग्योदय अपार्टंमेट, कालिका पार्कजवळ सकाळी १० वाजता भालचंद्र संत यांच्या हस्ते श्रींची महापूजा, दुपारी महाआरती, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भक्तिसंध्या हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम राघवेंद्र अंकलगी, सावणी कुलकर्णी व नितीन जोशी यांनी सादर केला. तत्पुर्वी श्रीरंगावधून भजनी मंडळाच्या सदस्यांनी विविध भजने सादर केली. सायंकाळी ६ वाजता अंतर्नाद हा दिगंबर सोनवणे व रसिक कुलकर्णी यांच्या विद्यार्थी गणांचा २१ नवोदित तबलावादकांची जुगलबंदीचा कार्यक्रम रंगला. सायंकाळी ७.३० वाजता भावांजली हा भक्तिगीतांचा कार्यक्रम स्वरसाज विनोद कुलकर्णी, प्रसाद गोखले व सहकलाकार यांनी सादर केला. रात्री ९.३० वाजाता शेजारतीने कार्यक्रमाची सांगता झाली. धनंजय संत यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.