ना हरकत प्रमाणपत्रासाठी मनपाकडे २१०० अर्ज
By admin | Published: January 29, 2017 10:54 PM2017-01-29T22:54:40+5:302017-01-29T22:55:00+5:30
धावपळ : ११०० प्रमाणपत्र वाटप
नाशिक : महापालिका निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थेतील कोणत्याही करांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक असल्याने ना हरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेकडे आतापर्यंत २१०० अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ११०० उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी यंदाही १२२ जागांकरिता दोन हजारांहून अधिक उमेदवार इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारच्या करांची थकबाकी नसली पाहिजे. थकबाकीदार असलेल्या उमेदवारांच्या अर्जावर कुणी आक्षेप घेतल्यास आणि त्यात तो थकबाकीदार असल्याचे आढळून आल्यास त्याचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला जातो. उमेदवारांना त्यासाठी अर्जासोबत थकबाकीदार नसल्याचा ना हरकत दाखला जोडणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी मागणी केल्यानंतर सदर दाखला देण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून, आतापर्यंत महापालिकेकडे २१०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १८५० अर्जदारांचे ना हरकत प्रमाणपत्र स्वाक्षरीनिशी तयार करण्यात आले. त्यामध्येही आतापर्यंत ११०० उमेदवारांनी सदर ना हरकत दाखले नेले आहेत. उर्वरित सुमारे २५० अर्जांबाबत छाननी-पडताळणीचे काम सुरू असल्याची माहिती दोरकुळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)