मालेगावी होणार २१५ खाटांची सुविधा उपलब्ध : दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:52 AM2021-12-13T00:52:19+5:302021-12-13T00:52:56+5:30
केंद्र व राज्य शासनासह सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून शहरात साकारण्यात येणाऱ्या अद्ययावत रुग्णालयांमुळे कोरोनाच्या संकटात येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.
मालेगाव : केंद्र व राज्य शासनासह सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून शहरात साकारण्यात येणाऱ्या अद्ययावत रुग्णालयांमुळे कोरोनाच्या संकटात येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.
मालेगाव शहर व ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात तीन अद्यावत रुग्णालयांचे भूमिपूजन भुसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अल्पसंख्याक कल्याण निधी अंतर्गत द्याने-रमजानपुरा येथे १५ खाटांचे अद्ययावत रुग्णालय तसेच मालेगाव कॅम्प येथे १०० खाटांचे रुग्णालय अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून साकारण्यात येणार आहे, तर मालेगावतील मोसम पुलाजवळ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अद्ययावत असे १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय उभारले जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण १२ रुग्णालयांना मंजुरी मिळाली असतांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महिला व बाल रुग्णालयाच्या बांधकामाची सुरुवात मालेगावातून होत असल्याचेही भुसे यांनी सांगितले.
शहरात साकारण्यात येणाऱ्या नवीन रुग्णालयांच्या इमारतींकरिता स्थानिक नागरिकांसह महानगरपालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्या असून, शहरात साकारण्यात येणाऱ्या सर्व रुग्णालयात संपूर्ण सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, गटनेते मनोहर बच्छाव, महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, संजय दुसाने, रामा मिस्तरी, श्रीमती अनिता भुसे, नगरसेवक नारायण शिंदे, अनिल भुसे, भय्या देशमुख, तानाजी देशमुख आदी उपस्थित होते.