नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी २२ बाळांचा जन्म !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:55+5:302021-01-02T04:12:55+5:30
नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एकूण २२ बाळांचा जन्म झाला असून त्यात ११ नाॅर्मल तर ११ ...
नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एकूण २२ बाळांचा जन्म झाला असून त्यात ११ नाॅर्मल तर ११ सिझर डिलिव्हरी झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आता सारे काही सामान्य अर्थात न्यू नॉर्मल कारभार सुरू झाला असल्याचेच दिसून येऊ लागले आहे.
कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या अन्य सामान्य रुग्णांचे तसेच प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाणदेखील घटले होते. सिव्हिलमध्ये कोरोनावर उपचार सुरू असल्याची दहशत गोरगरीब माता-भगिनींनादेखील वाटत होती. त्यामुळे मग अगदी सामान्य कुटुंबातील महिलादेखील सिव्हिलऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करीत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील सामान्य प्रसूतीचे प्रमाण काही काळ थाेडेसे घटले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण घटू लागल्याने सर्वसामान्य रुग्णांसह प्रसूतीसाठीच्या महिलांचे प्रमाण हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले होते. त्यात डिसेंबर महिन्यात चांगलीच भर पडत गेली असून सारे काही सुरळीत अर्थात न्यू नॉर्मल सुरू झाले होते. त्याचाच प्रत्यय जानेवारीच्या प्रारंभापासून मिळू लागला आहे.
इन्फो
नऊ महिन्यात कोरोनाबाधित १०३ महिलांची डिलिव्हरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या गंभीर रुग्णांप्रमाणे कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षामध्ये एप्रिलपासूनच्या गत ९ महिन्यात दाखल झालेल्या १०३ कोरोनाबाधित महिलांची प्रसूती सुखरूपपणे करण्यात आली आहे. त्यात ६१ महिलांची नॉर्मल तर ४२ महिलांची सिझर डिलिव्हरी करण्यात आली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात येत आहे. त्यात कोरोना चाचणीत बाधित आढळणाऱ्या महिलांसाठी जिल्हा रुग्णालयातच स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून त्यात तब्बल २० बेड ठेवण्यात आले आहेत. तिथे आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष कक्षात दाखल होणाऱ्या गर्भवती कोरोनाबाधित महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य सर्व स्टाफचीदेखील स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली. या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने अत्यंत प्रभावीपणे काम केल्यामुळेच गत ९ महिन्यात १०३ कोरोनाबाधित महिला दाखल झाल्या. त्यातील दोन अपवाद वगळता अन्य सर्व महिला सुखरूपपणे प्रसूत झाल्या. विशेष म्हणजे या १०३ महिलांची बाळेदेखील सुखरूप आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची बाधा आढळून आली नसल्याचे स्त्रीरोग विभागाचे तज्ज्ञ डॉ. गणेश गोसावी यांनी सांगितले.