२२ पक्ष, संघटना रिंगणात
By admin | Published: February 10, 2017 01:08 AM2017-02-10T01:08:26+5:302017-02-10T01:09:03+5:30
उमेदवारी देण्यात भाजपा, सेना अव्वल : दोघांचा एकच उमेदवार
नाशिक : निवडणूक रिंगणात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांबरोबरच विविध संघटना अशा २२ पक्षांनी आपले उमेदवार उभे केले असून, सर्वाधिक उमेदवार उभे करण्यामध्ये सत्ताधारी भाजपा व पाठोपाठ सेनेने बाजी मारली तर अवघा एक उमेदवार उभा करून काही पक्षांनी आपली ताकद आजमाविण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक महापालिकेवर आजवर कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजपा, रिपाइं या पक्षाने आळीपाळीने सत्ता उपभोगली असून, यंदाच्या निवडणुकीतही याच पक्षांमध्ये प्रमुख लढती होणार असल्या तरी, लहान पक्ष व स्थानिक आघाड्यांनीही निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय ताकदीचा अंदाज घेण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी, कम्युनिष्ट पार्टी आॅफ इंडिया, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय कॉँग्रेस असे सहा राष्ट्रीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्याचबरोबर राज्यस्तरीय पक्षात गणले जाणारे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एआयएमआयएम समाजवादी पार्टी या चार पक्षांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.(प्रतिनिधी)
असे पक्ष, असे उमेदवार
भारतीय जनता पार्टी-११९, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी-५४, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया-२, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी-१४, बहुजन समाज पार्टी-३२, राष्ट्रीय कॉँग्रेस-४१, शिवसेना-११२, महाराष्ट्र नवनिर्माण सेना-९७, एआयएमआयएम-९, समाजवादी पार्टी-३ जनसुराज्य शक्ती-१, राष्ट्रीय समाज पक्ष-५ भारिप बहुजन महासंघ-१४, बहुजन विकास आघाडी-६, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)-४, धर्मराज्य पक्ष-११, आंबेडकर राइट पार्टी आॅफ इंडिया-२, संभाजी ब्रिगेड-२, भारतीय संग्राम परिषद-६, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-३, भारतीय जनहित कॉँग्रेस पार्टी-१, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)-८ राजकीय कुवतीप्रमाणे उमेदवारइतर पक्षांमध्ये जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, भारिप बहुजन महासंघ, बहुजन विकास आघाडी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर), धर्मराज्य पक्ष, आंबेडकर राइट पार्टी आॅफ इंडिया, संभाजी ब्रिगेड, भारतीय संग्राम परिषद, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारतीय जनहित कॉँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांनीही आपल्या राजकीय कुवतीप्रमाणे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
२७५ अपक्ष उमेदवार आखाड्यात
महापालिकेच्या १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार रिंगणात असून, त्यात राजकीय पक्षांकडून उमेदवारी न मिळालेले तसेच राजकीय पक्षाची बंधने झुगारून देणाऱ्या २७५ अपक्षांनीही निवडणुकीत राजकीय भवितव्य आजमावण्याचे ठरविले आहे. काही ठिकाणी याच अपक्षांच्या ताकदीचा अंदाज घेत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांनी पुरस्कृत करून आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.