गुजरातवरून येणारी २२ हजारांची मिठाई जप्त; अन्न औषध प्रशासनाची कारवाई

By संजय दुनबळे | Published: August 5, 2023 03:14 PM2023-08-05T15:14:33+5:302023-08-05T15:14:39+5:30

कळवण येथे तेलसाठा सील, परिवहन कायद्यानुसार खासगी प्रवासी बसद्वारे व्यावसायिक दृष्टीने सामान किंवा अन्नपदार्थ यांची वाहतूक करता येत नाही

22,000 sweets coming from Gujarat seized; Action by the Food and Drug Administration | गुजरातवरून येणारी २२ हजारांची मिठाई जप्त; अन्न औषध प्रशासनाची कारवाई

गुजरातवरून येणारी २२ हजारांची मिठाई जप्त; अन्न औषध प्रशासनाची कारवाई

googlenewsNext

सातपूर : बनावट आणि भेसळ अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा सपाटा कायम ठेवला असून नाशिक आणि कळवण येथे खाद्यपदार्थ तसेच तेलाचा साठा जप्त केला आहे. तर मालेगाव येथील एका मेडिकलवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, परराज्यातून शहरात येणाऱ्या मिठाईवर लक्ष केंद्रित करून अन्न व औषध प्रशासनाने २२ हजार रुपये किमतीची १२० किलो गुजरातची मिठाई जप्त केली आहे.

परिवहन कायद्यानुसार खासगी प्रवासी बसद्वारे व्यावसायिक दृष्टीने सामान किंवा अन्नपदार्थ यांची वाहतूक करता येत नाही. तसेच नाशिक शहरातील बरेच मिठाई विक्रेते हे परराज्यातून येणाऱ्या स्पेशल बर्फीचा वापर पेढा, बर्फी, मिठाई व तत्सम पदार्थ बनविण्याकरिता करत असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मनिष सानप अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, प्रमोद पाटील यांनी द्वारका येथे पाळत ठेवून गुजरात येथून आलेल्या वीर ट्रॅव्हल्स आणि पार्सल सर्व्हिसेस या खासगी प्रवासी बसची तपासणी केली. या बसमधून नाशिक येथील मे. यशराज डेअरी अँण्ड स्वीटस, उपनगर, शांताराम बिन्नर (रा. आडवाडी, ता. सिन्नर) यांनी गुजरातमधून डिलिशिअस स्वीट्स व हलवा हे अन्नपदार्थ मागविले असल्याचे आढळून आले.

विक्रेत्याकडून अन्नपदार्थांचे नमुने घेऊन उर्वरित १२० किलो वजनाचा २२ हजार ३०० रुपये किमतीचा मिठाई साठा जप्त करण्यात आला.
दरम्यान, खासगी बस वाहतूकदारांनी अन्नपदार्थांची वाहतूक करू नये. याबाबत शहरातील मिठाई विक्रेता संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन विक्रेत्यांना गुजरात बर्फीचा वापर करून पेढे, मिठाई बनवून त्यांची विक्री करू नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती नारागुडे यांनी दिली आहे.

कळवणला तेलसाठा सील

अन्न व औषध प्रशासनाने कळवण येथील प्रसाद प्रोव्हिजन या दुकानाला भेट दिली असता अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक अन्न परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच त्या ठिकाणी खुल्या स्वरूपात एक टन क्षमतेच्या टाकीतून नळाद्वारे खुल्या खाद्यतेलाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. यावेळी तेलाचा नमुना घेऊन ५७ हजार ५४० रुपये किमतीचा ५४८ किलोचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. तसेच विनापरवाना व्यवसाय करीत असल्याने व्यवसाय बंदबाबत विक्रेत्यास नोटीस बजावण्यात आली आहे.

मालेगावी मेडिकलवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने बनावट, भेसळ आणि लेबलदोषयुक्त अन्नपदार्थ जप्तीची मोहीम अधिक तीव्र केली असून मालेगाव येथील एका मेडिकल दुकानातून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे लेबलदोषयुक्त न्यूट्रास्यूटीकल जप्त केले आहे. मालेगाव शहरातील मे. सैफी मेडिकल एजन्सीजवर धाड टाकली. या धाडीत विक्रीसाठी साठविलेल्या २४ हजार ९४० रुपये किमतीचा लेबलदोषयुक्त न्यूट्रास्यूटीकलचा साठा जप्त केला आहे. सदरच्या अन्नपदार्थाच्या बॉटल्सवर नेमके कोणते घटक वापरले आहेत, उत्पादक कोण आहे, माल कुठून आणला, याची माहिती घेण्यात येत आहे.

Web Title: 22,000 sweets coming from Gujarat seized; Action by the Food and Drug Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.