लाचखोर अभियंत्यांकडून २२़४६ लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:18 AM2017-10-17T00:18:48+5:302017-10-17T00:18:55+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : घरझडतीतील कारवाई; पोलीस कोठडीची मागणी करणार नाशिक : शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांच्या घरझडती व पोलीस कोठडीतील कालावधीत २२ लाख ४६ हजार १९४ रुपयांची मालमत्ता शोधून काढली आहे़ विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केवळ एकाच अभियंत्याचे बँक लॉकर शोधण्यात यश आले असून, उर्वरित दोघांचे बँकेत खातेच नव्हते का? स्थावर मालमत्तेचे काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत़
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : घरझडतीतील कारवाई; पोलीस कोठडीची मागणी करणार
नाशिक : शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांच्या घरझडती व पोलीस कोठडीतील कालावधीत २२ लाख ४६ हजार १९४ रुपयांची मालमत्ता शोधून काढली आहे़
विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केवळ एकाच अभियंत्याचे बँक लॉकर शोधण्यात यश आले असून, उर्वरित दोघांचे बँकेत खातेच नव्हते का? स्थावर मालमत्तेचे काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत़
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय ठेकेदार युवराज मोहिते यांनी पूर्ण केलेल्या रस्ता दुरुस्ती कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले़ या तिघांपैकी पवार यांच्या घरझडतीत रोख रक्कम व सोने मिळून आठ लाख २० हजार ६९४ रुपयांचा, पाटील यांच्या घरझडतीत रोख रक्कम व सोने मिळून सहा लाख सात हजार ४५० रुपयांचा, तर देशपांडे यांच्या घरझडतीत ८ लाख ७ हजार ९३३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़
लाचखोर अभियंत्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (दि़१७) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़
मंगळवारी या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे़ यावेळी तपासासाठी आणखी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे़
यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन अधीक्षक शशिकांत महावरकर यांनी कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व जगदीश वाघ यांची कोट्यवधी रुपयांची अपसंपदा शोधून काढली होती, तर सद्यस्थितीत अटक करण्यात आलेल्या तिन्ही अभियंत्यांपैकी केवळ एकाचे लॉकर सापडले असून, त्यांचे बँक खाते, लॉकर व स्थावर मालमत्तेचा शोध लावण्यात यश आलेले नाही़ त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासापद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे़अभियंता पवार यांच्याकडे सात लाखांचे सोनेसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार यांच्या घरझडतीत सहा लाख ४५ हजार १९४ रुपयांचे सोने, तर एक लाख ७५ हजार ५०० रुपयांचे रोख रक्कम आढळून आली असून, रोख रकमेपेक्षा सोन्याचे प्रमाण अधिक आहे़
उपअभियंता पाटील यांचे सोने लॉकरमध्ये
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन प्रतापराव पाटील यांच्या घरझडती तसेच कुटुंबीयांच्या केलेल्या चौकशीत कॅनडा कॉर्नरवरील शिरपूर पिपल्स को-आॅप़ बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार बँकेतील लॉकरची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये १७ तोळे सोने आढळून आले़शाखा अभियंत्यांकडे चांदीची भांडी अधिक
शासकीय ठेकेदार युवराज मोहिते यांच्याकडून तीन लाखांची लाच स्वीकारणारे शाखा अभियंता अजय देशपांडे यांच्या घरझडतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल चार किलो ७२६ गॅ्रम वजनाची चांदीची भांडी व ६ लाख १४ हजार २०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली़लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही अभियंत्यांची घरझडती घेण्यात आली असून रोख रकमेसह सोने चांदी जप्त करण्यात आले आहेत़ याबरोबरच आरटीओ तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांकडे पत्र पाठवून स्थावर मालमत्तेचा शोध घेतलाजाणार आहे़ मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपणार असून, न्यायालयाकडे तपासासाठी कायदेशीरदृष्ट्या पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची विनंती केली जाणार आहे़
- डॉ़ पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक