नाशकातील २२५२ सहकारी गृहनिर्माण संस्था अवसायनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:34 PM2018-02-08T13:34:00+5:302018-02-08T13:36:16+5:30
लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी दूर करून ३ महिन्यांत दोष दुरु स्ती अहवाल सादर करणे बंधनकारक
नाशिक : नाशिक तालुक्यात ७ हजार ३३ गृहनिर्माण संस्था असून, यातील ४ हजार ७८१ संस्थांनी वार्षिक लेखापरीक्षण केले आहे. तब्बल २ हजार २५२ सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आॅडिट न केल्याने त्या अवसायनात काढण्यात आल्या असून, संबंधित संस्थांना पुनर्जीवित करण्यासाठी आतापर्यंतचे लेखापरीक्षण पूर्ण करावे लागणार आहे.
राज्यात सहकार चळवळीचे जाळे मोठे असले तरी यातील अनेक गृहनिर्माण संस्था रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यात नाशिक तालुक्यातील सुमारे २२५२ संस्थांचा समावेश असून, त्यांना अवसायनात काढण्याच्या नोटिसाही काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संस्थांनी त्यांचे लेखापरीक्षण नियमित करून तालुका निबंधकांना अहवाल सादर न केल्यास अशा संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था आॅडिटकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही संस्था लेखापरीक्षण करून घेतात, पण तो तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करत नाहीत. सर्व संस्थांनी दिलेल्या मुदतीत लेखापरीक्षण करून घेणे सक्तीचे आहे. लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी दूर करून ३ महिन्यांत दोष दुरु स्ती अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या संस्थांनी दरवर्षी लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक असते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे प्रमाण अत्यंत नगण्य होते. दरवर्षी केवळ १० ते २० टक्केच संस्था लेखापरीक्षण अहवाल सादर करत होत्या. आता या प्रमाणात वाढ होत असली तरी अजूनही २ हजार २५२ संस्थांचे आॅडिट झालेले नसल्याचे समोर आले आहे.