साडेचार वर्षांत १८२ बंधाऱ्यांतून २३ लाख घनमीटर गाळउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:03+5:302021-06-16T04:19:03+5:30
या अभियानामुळे तालुक्यातील भूजल पातळी वाढल्याने विहिरींना भर उन्हाळ्यातही पाणी राहू लागले आहे. पाण्यासाठी टँकरची मागणी करण्याची वेळ कुणावरही ...
या अभियानामुळे तालुक्यातील भूजल पातळी वाढल्याने विहिरींना भर उन्हाळ्यातही पाणी राहू लागले आहे. पाण्यासाठी टँकरची मागणी करण्याची वेळ कुणावरही येत नाही. तालुका टँकरमुक्त झाल्याने दरवर्षी येणारा सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च वाचला आहे. तालुक्यात भोजापूर (३३० दश लक्ष घनफूट) हे एकमेव मोठे धरण असून कोनांबे, ठाणगाव, सरदवाडी या छोट्या धरणांसह ८४ गावांमधील १८२ पाझरतलाव, सिमेंट नाला बांध, छोट्या नाल्यांमधला २३ लाख ६ हजार क्युबीक मीटर संस्थेने शेतकऱ्यांना सोबत घेऊन नियोजनबद्ध गाळ काढण्यात यश मिळविले. त्यातून तालुक्याची पाणी साठवण क्षमता ८१.४३ दशलक्ष घनफूट अर्थात २३०६ टीसीएमने वाढली. या कामामुळे संबंधित गावांमधील जवळपास ३७०० विहिरींचे पुनर्भरण झाले. तर काढलेला गाळ शेतकऱ्यांनी स्व:खर्चाने नेत १७१९ एकर पडीक जमीन सुपीक बनविली.
या कामासाठी टाटा ट्रस्टने ६ पोकलेन व ३ जेसीबी युवा मित्रला दिले. एटीई चंद्रा फाऊंडेशनने ३० पोकलेन भाड्याने घेण्यासाठी आर्थिक मदत केली. राज्य शासनाने सर्व मशिन्ससाठी डिझेलचा खर्च उचलला. काही उद्योगांनी सीएसआर फंड दिला. तत्कालीन सरकारच्या कार्यकालात जलसमृद्धी अभियानांतर्गत ‘गाळ मुक्त धरण, गाळ मुक्त शिवार’ योजनेत युवा मित्रने पुढाकार घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. तलावांमधील गाळ पडीक जमिनीत टाकल्यास जमिनीला सुपीक बनवू शकतो हे त्यांना पटवून दिले आणि गाळ स्वखर्चाने उचलून नेण्यासाठी राजी केले.
कोट...
जामनदीच्या नांदूरशिंगोटे जवळील उगमापासून मिठसागरेपर्यंतच्या नदीपात्राचे खोलीकरण, रुंदीकरण केले. सुरेगाव, दत्तनगर नाल्यांवरील बंधाऱ्यांतून गाळ काढला. या पद्धतीने विविध कामे केली. सिंचनाला फायदा झाला.
- मनीषा पोटे, कार्यकारी संचालक, युवा मित्र
इन्फो...
साडेचार वर्षांत उकरले १८२ बंधारे
साडेचार वर्षांत ८४ गावांतील १८२ बंधारे, नाल्यांमधील २३ लाख ६ हजार क्यू. मीटर गाळ शेतकऱ्यांनी स्व:खर्चाने वाहून नेत १७१९ एकर जमीन सुपीक बनविली. तालुक्याची साठवण क्षमता ८१.४३ दशलक्ष घनफुटने वाढली.
इन्फो...
तालुक्यात झालेले काम
एकूण गावे - ८४
सिमेंट नाला बांध - ६८
पाझर तलाव - ६४
छोटे नाले - ४७
लघु सिंचन प्रकल्प - ०३
चौकट-
तालुक्यातील प्रमुख धरणांची सध्याची परिस्थिती-
धरणाचे नाव साठवण क्षमता (द.ल.घ.फू.) काढलेला गाळ (घन मीटर) पाणीसाठ्यात वाढ (दलघफू) तयार शेतजमीन (एकर)
सरदवाडी ७७.०७ १,२९,४७३ ४.५७ ८६.१
कोनांबे ५४.५० १,६१,५२३ ५.७० २८४.०
ठाणगाव ५०.३० १,२५,१९० ४.४१ ७८.०
फोटो - १४ सरदवाडी डॅम
गतवर्षी गाळ उपशानंतर काठोकाठ भरलेला सिन्नरजवळील सरदवाडी बंधारा.