एटीएम फोडून २३ लाखांची लूट सटाण्यातील घटना : गॅस कटरचा वापर; अन्य एटीएम फोडण्याचाही प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:17 AM2017-12-01T01:17:44+5:302017-12-01T01:18:47+5:30
मालेगाव रोडवरील सटाणा बाजार समितीसमोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २३ लाख १२ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली.
सटाणा : शहरातील मालेगाव रोडवरील सटाणा बाजार समितीसमोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २३ लाख १२ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, चोरट्यांनी बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएमदेखील गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
सटाण्यात स्टेट बँकेची चार एटीएम मशिन्स असून, त्यापैकी मालेगाव रोड येथील बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोरच्या एका एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम ब्रिंक इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी करते. गुरुवारी सकाळी हे एटीएम बंद असल्याची आॅनलाइन माहिती कंपनीच्या मुंबई कार्यालयाला प्राप्त झाल्याने त्यांनी एजन्सीचे आॅपरेटर योगेश वैद्य, सतीश रौंदळ यांना एटीएम केंद्रावर भेट देण्याचा आदेश दिला. सकाळी ७ वाजता या कर्मचाºयांनी एटीमला भेट दिली असता एटीएमचा व्हॉल्ट दरवाजा गॅस कटरने कापलेला आढळून आला. एटीएम फोडल्याचे निदर्शनास येताच कर्मचाºयांनी स्टेट बँकेचे कॅश आॅफिसर लक्ष्मण करवाडे यांना घटनेची माहिती दिली. करवाडे यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधत एटीएम गाठले. मशीनमधील शिलकीची आॅनलाइन माहिती घेतली असता ५०० रुपयांच्या ४२७५, तर १०० रु पयांच्या १७५० अशी २३ लाख ११ हजारांची रोकड चोरट्यांंनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. करवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या एटीएममधून रोकड लुटल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएम कडे वळविला. हे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे दिसून आले आहे. सटाणा पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तपासासासाठी तीन विशेष पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत.