२३ वर्षांनंतर चोरीच्या गुन्ह्यात सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:12 AM2019-01-08T01:12:25+5:302019-01-08T01:12:40+5:30
एलआयसी कार्यालयातून सात हजार ९६१ रुपये किमतीचा धनादेश एलआयसी एजंटच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून युनायटेड वेस्टर्न बॅँकेची बनावट नावाने १९९५ साली फसवणूक करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.३) सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याला सुमारे २३ वर्षांचा कालावधी झाला आहे.
नाशिक : एलआयसी कार्यालयातून सात हजार ९६१ रुपये किमतीचा धनादेश एलआयसी एजंटच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून युनायटेड वेस्टर्न बॅँकेची बनावट नावाने १९९५ साली फसवणूक करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.३) सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याला सुमारे २३ वर्षांचा कालावधी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, उपनगर परिसरातील गणेश कॉलनीमध्ये राहणारा आरोपी सुधीर श्रीराम वरखेडे (४८) याने एलआयसी एजंट ईश्वरीलाल कोठारी यांच्या नावाने स्वत:ची ओळख पटवून बनावट कागदपत्रे सादर केली व धनादेश प्राप्त करून घेत संबंधित बॅँकेतून वटवून घेतला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर एलआयसीचे शाखाधिकारी व्ही. जयंतकुमार यांनी त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरखेडेविरुद्ध पोलिसांनी फसवणूक, चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक डी. के. घुगे यांच्याकडे होता. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून ते न्यायालयापुढे सादर केले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विजय के दार यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयापुढे आलेल्या पुराव्याच्या आधारे वरखेडे यास दोषी धरले. त्यास या गुन्ह्यात तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अॅड. एस. एस. चिताळकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली.