चैत्रोत्सवात देवीचे २४ तास दर्शन
By admin | Published: March 24, 2017 08:43 PM2017-03-24T20:43:05+5:302017-03-24T20:44:04+5:30
सप्तशृंगगड : येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी विविध विभागांची तयारी पूर्णत्वाला आली असून, मंदिर २४ तास खुले ठेवून खास व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सप्तशृंगगड : येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी विविध विभागांची तयारी पूर्णत्वाला आली असून, यात्रोत्सव कालावधीत भाविकांची सोय व्हावी यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर २४ तास खुले ठेवून खास व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, तहसीलदार कैलास चावडे, सप्तशृंगगड ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या कार्यालयात झाली. यावेळी हे निर्णय घेण्यात आले.
सप्तशृंगगड ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोधर बैठकीला उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, १३ ते १४ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील, असा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. दर्शनाच्या वेळी तसेच पहिल्या पायरीपासून ते मंदिर गाभाऱ्यापर्यंत भाविकांवर व परिसरात सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.
यात्रा कालावधीत नांदुरी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रोत्सव कालावधीत सप्तशृंगगडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे तर गावातील वाहनांना पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी ८० कंत्राटी कामगारांची नेमणूक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये टीसीएल टाकून जल शुद्धीकरण करण्यात येणार आहे.
तात्पुरते स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे. गावातील सर्व पथदीपांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. चैत्रोत्सवादरम्यान नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण व आरोग्य विभागाच्या वतीने सप्तशृंगगड, नांदुरी येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, परिचर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येणार आहे तसेच रुग्णांसाठी ट्रस्ट व जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव यात्रा कालावधीत ट्रस्टतर्फे भगवती मंदिर, सभामंडप, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य, मोफत महाप्रसाद तसेच परिसर बंदोबस्त, साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी संरपच सुमनबाई सूर्यवंशी, माजी सरपंच संदीप बेनके , ग्रामस्थ व्यापारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)