२४ लाख टन कांद्याची विक्रमी निर्यात
By admin | Published: March 24, 2017 11:04 PM2017-03-24T23:04:03+5:302017-03-24T23:04:30+5:30
लासलगाव यावर्षी कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आवकही चांगली झाली आहे. परिणामी निर्यातही विक्रमी होत आहे. हंगामामध्ये कांदा निर्यातीमध्ये नऊ महिन्यात २४ लाख टन कांदा निर्यात झाला.
शेखर देसाई : लासलगाव
यावर्षी कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आवकही चांगली झाली आहे. परिणामी निर्यातही विक्रमी होत आहे. हंगामामध्ये कांदा निर्यातीमध्ये नऊ महिन्यात २४ लाख टन कांदा निर्यात झाला. कांदा निर्यातीने २००९-१० झालेल्या १८.७३ लाख टन
निर्यातीचा विक्रम या २०१६-१७ मध्ये पार केला. देशात आजपर्यंत झालेल्या कांदा निर्यातीचा हा उच्चांक आहे. कांद्यावरील किमान निर्यातमूल्य दर हे शून्य केल्याने निर्यातीत वाढ झालेली आहे. देशातून झालेली २४ लाख टन कांदा निर्यात ही एप्रिल ते डिसेंबर या महिन्यातील आहे. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत कांदा निर्यात ही ३० लाख टन होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे कांदा निर्यात जरी भरघोस वाढलेली असली तरी कांद्याचे उत्पादन यावर्षी मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होत आहे. त्यामुळे कांद्याला चारशे ते पाचशे रुपये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकाला कांदा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने त्यांच्यावरची आर्थिक चिंता कायम आहे. कांदा म्हटले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याची चर्चा असते. कधी ग्राहकांच्या तर कधी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यामुळे उत्पादकाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यंदा निसर्गाने शेतीला चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली.