रथोत्सवाची २४५ वर्षांची परंपरा
By Admin | Published: April 6, 2017 10:49 PM2017-04-06T22:49:09+5:302017-04-06T22:54:53+5:30
नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरुड रथयात्रेची २४५ वर्षांपासूनची परंपरा
संदीप झिरवाळ / नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरुड रथयात्रेची २४५ वर्षांपासूनची परंपरा असून, श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी सवई माधवराव पेशवे यांना आरोग्य प्राप्ती व्हावी यासाठी नवसपूर्ती केली होती. नवसपूर्ती पूर्ण झाल्यानंतर पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला रामरथ अर्पण केला होता. या श्रीराम रथाची देखभालीची जबाबदारी त्यांचे मामा श्रीमंत सरदार रास्ते यांच्याकडे दिला होती त्यावेळी रास्ते यांनी रास्ते आखाडा तालीम संघ स्थापन करून व्यायामप्रेमी घडविले व तेच व्यायामप्रेमी पुढे रथ ओढण्याची जबाबदारी पार पाडू लागले तेव्हापासून ते आजतागयत श्रीराम रथाची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडेच आहे. पूर्वी रथमार्ग खडतर असल्याने एकदा रथमार्गावरील वाघाडी नाल्यात श्रीरामाचा रथ चिखलात फसल्याने त्यावेळी समस्त पाथरवट समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा रथ सुखरूपपणे बाहेर काढला होता तेव्हापासून रामरथाच्या धुरीचा मान हा पाथरवट समाजाकडेच आहे. रामरथाचे मान सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, तर गरुड रथाचा मान अहल्याराम व्यायामशाळेकडे आहे. या रथाचा इतिहास बघितला तर रथाचे मुख्य मानकरी हे बुवा असतात व हे बुवाच सर्व मानकऱ्यांचा गंध लावून सत्कार करतात. श्रीरामाचा रथ हा पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेला आहे. काही वर्षांपूर्वीच या रथाची चाके बदल्यात आली आहेत. १७७२ पासून या रथोत्सवाची परंपरा असून या रथोत्सवात संपूर्ण नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.
रथोत्सवाच्या दिवशी उत्सवाचे मानकरी असलेले बुवा हे दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथमार्गावर मार्गक्रमण करतात. दरवर्षी पुजारी कुटुंबीयातील सदस्यांना हा मान मिळतो. गरुड रथ हा रामाच्या रथापेक्षा लहान असून, १९६५ ला गरुड रथ नव्याने तयार करण्यात आला आहे.