‘ ‘शासन आपल्या गावात’ उपक्रमांतर्गत २४८ नवीन शिधापत्रिका वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:51 AM2018-06-13T00:51:18+5:302018-06-13T00:51:18+5:30
शिंदे गावात ‘शासन आपल्या गावात’ या उपक्रमांतर्गत २४८ नवीन शिधापत्रिका वाटप व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ३४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
नाशिकरोड : शिंदे गावात ‘शासन आपल्या गावात’ या उपक्रमांतर्गत २४८ नवीन शिधापत्रिका वाटप व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ३४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. शिंदे गावात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत ग्रामस्थांशी संवाद साधला. संजय गांधी योजनेत लाभार्थ्यांची कागदपत्रांची पूर्तता नसल्याने लाभार्थी कमी असतात. तसेच पुढील काळात ई-सेवा केंद्रातच या सर्व सोयी मिळतील, असे अहिरराव यांनी स्पष्ट केले. यावेळी जुन्या जीर्ण झालेल्या शिधापत्रिका, नवीन शिधापत्रिका, शिधापित्रकेत नाव कमी करणे, नाव वाढवणे यांचे अर्ज भरून २४८ जणांना शिधापत्रिकेचे वाटप लागलीच करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावण बाळ योजना, लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाच्या सुनीता पाटील, नरेंद्र बाहिकर, देवीदास उदार, संजय गांधी योजनचे ज्ञानेश्वर धांडे, जयश्री अहिरराव, प्रवीण पाटील, माया शिवदे, सतीश बोडके, परिघा उपासनी आदी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार उपसभापती संजय तुंगार, सरपंच माधुरी तुंगार, मंडल अधिकारी सईद शेख तलाठी बाळासाहेब काळे, पोलीसपाटील रवींद्र जाधव, ग्रामसेवक विजयराज जाधव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.