सेवनिवृत्तीला अवघे 25 दिवस उरले असता जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये आले वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 03:59 PM2021-10-06T15:59:34+5:302021-10-06T15:59:49+5:30
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पतोंडामध्ये होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
नाशिक : मुळ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पतोंडा गावाचे भूमिपुत्र असलेले भारतीय सेनेचे जवान गणेश सोनवणे (36) यांना जम्मू -काश्मीर येथे देशसेवा बजावताना वीरमरण आले. मंगळवारी (दि 5 ) कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला. यामध्ये ते जखमी झाले असता त्यांना जवळच्या लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते या महिन्याच्या अखेरीस भारतीय सेनेतून सेवानिवृत्त होणार होते.
सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकमधील अंबड येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या कुटूंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती कळवली आहे. गणेश सोनवणे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात्त पत्नी दोन मुली ,आई असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी (दि.6) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नाशिकच्या अंबड येथील निवासस्थानी येणार असून त्यांच्या मूळ गावी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
25 दिवसात सेवा निवृत्त होणार होते
काही दिवसांपूर्वीच गणेश यांचे आपल्या मुलीशी अखेरचं बोलणं झालं होतं. 'मी 30 ऑक्टोबरला सेवा निवृत्त होत आहे, त्यानंतर बेटा आपण सर्वजण सोबतच राहू आणि माझ्या साहेबांनी आणि माझ्या सोबतींनी मला एक चार चाकी गाडी गिफ्ट दिली आहे. आपण त्या गाडीने फिरू आणि खूपच मज्जा करू बेटा,' असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. पण, काही दिवसातच सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी फोन करून त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. गणेश सोनवणे यांचे दोन्ही बंधूचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आणि मंगळवारी गणेश सोनवणे देशसेवा करीत असतांना शहीद झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.