२५ लाखांचा चिटफंड घोटाळा उघड; नाशिकमध्ये ४०० लोक आमिषाला पडले बळी
By अझहर शेख | Published: January 2, 2024 04:42 PM2024-01-02T16:42:11+5:302024-01-02T16:42:34+5:30
संचालक महिलेसह पाच एजंटांना बेड्या
नाशिक : ‘शून्य टक्क्याने लाखांत कर्ज घ्या अन् ४० टक्के सबसिडीही मिळवा...’ अशा पद्धतीने मार्केटिंग करत बालाजी फायनान्स सर्व्हिसेस व एस.के फायनान्स सर्व्हिसेस नावाने पाथर्डीफाटा भागात सुरू झालेल्या कंपन्यांनी शहरासह जिल्ह्यातील सुमारे ४००लोकांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले आहे. यामध्ये सुमारे १५० लोकांकडून प्रत्येकी दहा ते बारा हजार रूपये तर उर्वरित लोकांकडून चार ते पाच हजार रूपये घेत तोंडाला पाने पुसली आहेत. सुमारे २५ ते ३० लाखांपर्यंत या चिटफंड घोटाळ्याची व्याप्ती पोहचल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी एका महिलेसह पाच एजंटांना बेड्या ठोकल्या आहेत. मूळ हैदराबादच्या बालाजी फायनान्स कंपनी व नाशिकच्या पाथर्डीफाटा येथील एस.के फायनान्स कंपनीच्या एकूण वीस संशयितांनी मिळून संगनमताने लेाकांना विना व्याज कर्जाचे आमिष दाखविण्यास सुरूवात केली. नोव्हेंबर महिन्यापासून हा प्रकार पाथर्डीफाटा भागात सुरू झाला. डिसेंबरअखेरपर्यंत नाशिक शहरासह इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्येही याप्रकरणाची चर्चा पसरली. विना व्याज लाखांचे कर्ज व सबसिडी मिळणार असल्यामुळे नागरिकांनी पाथर्डीफाटा येथील कार्यालयात गर्दी वाढविली.
प्रोसेसिंग फी, करारनामा शुल्क, कर्जाचे सुरूवातीच्या दोन हप्त्याची रक्कम असे सुमारे दहा ते बारा हजार रूपये प्रत्येकाकडून उकळण्यास संशयितांनी सुरूवात केली. कोणालाही कर्जपुरवठा केला नाही. सुमारे ३०० ते ४०० लोकांची अशाप्रकारे फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तक्रारदार नरेश महेश शेर (३१,रा.त्रिमुर्ती चौक) यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. यानंतर हा सगळा प्रकार पोलिसांनी तपासातून समोर आणला. याप्रकरणात संशयितांनी स्वत:ची नावे देखील खोटी वापरली असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही कंपन्यांनी ज्या लोकांची फसवणूक केली असेल, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक संजय पिसे हे करत आहेत.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित महिला संचालक लावण्ण्या पटेल (३५,रा.सिडको), मोईजअली सय्यद (२६), नवनाथ खालकर (४५), सुगत औटे, उत्तम जाधव, विनोद जिनवाल उर्फ विकी (४०) या सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.५) पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित पटेल यांनी एम.एस्सीपर्यंत(बायोलॉजी) शिक्षण घेतले आहे. त्यांच्या नावे कुठलाही परवाना नसून केवळ शॉपेक लायसन्सवर त्यांनी कार्यालय सुरू केले होते, असे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. एकुण १४ एजंट या कंपनीसाठी काम करत होते. त्या सर्वांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.