जिल्ह्यात लावणार २५ लाख रोपे
By admin | Published: June 21, 2016 10:24 PM2016-06-21T22:24:58+5:302016-06-21T22:27:22+5:30
जिल्ह्यात लावणार २५ लाख रोपे
नाशिक : वन सप्ताहांतर्गत येत्या १ जुलै रोजी जिल्ह्यात २५ लाख झाडे लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने सोडला असून, त्यातील २२ लाख रोपे एकट्या वनविभागाकडून, तर अन्य २९ यंत्रणांकडून तीन लाख रोपे लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. मात्र जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, वन खात्याने २५ लाख रोपांची लागवड कशी केली याबाबत त्यांनीच अनभिज्ञता व्यक्त केली.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दोन कोटी वृक्षलागवडीचा आढावा घेतला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन शाळा, अंगणवाड्या या भोवतीच्या मोकळ्या मैदानात वृक्ष लागवड करण्याकामी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या मोहिमेत सर्वच शासकीय यंत्रणांना सहभागी करून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून सर्वत्र पाणीटंचाई भासत असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोर्चे, आंदोलने करावी लागली. वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी नागरी वस्तीकडे धाव घेतली असे असताना वन खात्याने २५ लाख रोपांची लागवड कशी केली व त्यासाठी पाणी कोठून आले असे विचारले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. याबाबत वन खात्यालाच विचारणा करा, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.