नांदगावी २५ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा
By admin | Published: December 21, 2016 11:55 PM2016-12-21T23:55:36+5:302016-12-21T23:55:59+5:30
नांदगावी २५ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा
नांदगाव : येथे २० ते २५ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून, भटक्या जनावरांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता सैरावैरा सुटलेल्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीला तोंड द्यावे लागत आहे. चावा घेण्यासाठी अंगावर आलेल्या कुत्र्याला घाबरून पडल्याने ज्येष्ठ नागरिकांचे गंभीर दुखापती झाल्याची घटना घडली आहे. दोनदा निवेदन देऊनही कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे, याची तक्रार करण्यासाठी मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांच्याकडे गेलेले डॉ. गणेश चव्हाण व नागरिक यांना दातीर यांच्या किंकर्तव्य वक्तव्याने थक्क केले. आधी तर नागरिकांना केबिनमध्ये येऊ न देता परस्पर टपालातच तुमचे निवेदन द्या. मग बघू.. असा पवित्रा घेतल्याने नागरिक संतापले. त्यावर सारवासारव करताना दातीर म्हणाले, ते कुत्रे सापडत नाहीत. प्राण्यांना मारता येत नाही. आम्ही काय त्यांना पकडून लांब नेऊन सोडणार. आज पुन: कारवाई करतो, असे थातुरमातुर उत्तर दिली. तुळशीदास तरटे यांना कुत्र्याने पाडले. त्यांच्या पायाचे हाड मोडले. उघड्या मारुती परिसरात या कुत्र्यांचा वावर आहे. ती गाडीखाली किंवा आडोशाला बसतात व अचानक न भुंकता पाठीमागून गुपचूप जाऊन चावतात. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून, या भागातून जाणारे जीव मुठीत घेऊन जात आहेत किंवा दुसऱ्या रस्त्याने जात आहेत. नांदगाव तालुका माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सेवक सहकारी पतसंस्था यांनी कुत्र्य ांचा बंदोबस्त करण्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे. पतसंस्थेत येणाऱ्या सभासदांना कुत्रे चावत असल्याने कार्यालय उघडता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पतसंस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांना कुत्रे चावले आहेत.
(वार्ताहर)