मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून २५ सर्पांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:08 AM2018-11-25T01:08:09+5:302018-11-25T01:08:50+5:30
कडवा कालव्यामधील पाण्यात मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून ‘दिवट’ जातीचे २५ सर्प मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी(दि.२४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांसह घटनास्थळ गाठले.
नाशिक : कडवा कालव्यामधील पाण्यात मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून ‘दिवट’ जातीचे २५ सर्प मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी(दि.२४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांसह घटनास्थळ गाठले. याबाबत वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पळसे साखर कारखान्याकडे जाणाºया रस्त्यालगत कडवा कालवा वाहतो. या कालव्यात काही प्रमाणात पाणी होते. त्यामुळे पाण्यात आढळून येणारे बिनविषारी ‘दिवट’ जातीचे २५ सर्प मासेमारीसाठी टाकण्यात आलेल्या नॉयलॉनच्या जाळ्यात अडकून मृत झाले. काही सर्प पाण्यावर तरंगत असल्याचे लक्षात आल्यानंतर एका जागरूक नागरिकाने तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. यानंतर वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी तत्काळ वनरक्षक विजय पाटील, गोविंद पंढरे इको-एको फाउण्डेशनचे सर्पमित्र वैभव भोगले यांना घटनास्थळी रवाना केले. कडवा कालव्याजवळ पोहचल्यानंतर तत्काळ वनरक्षकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यावर तरंगत असलेल्या सर्पांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ते जाळ्यात अडकल्याचे लक्षात आले. त्यानंतर युवकांच्या मदतीने वनरक्षकांनी जाळे ओढून बाहेर काढले असता सगळ्यांनाच धक्का बसला कारण त्या जाळ्यात मोठ्या संख्येने सर्प अडकल्याचे आढळून आले. तत्काळ कर्मचाºयांनी जाळे मोकळे करत तब्बल पाच सर्पांना जीवदान दिले; मात्र दुर्दैवाने तोपर्यंत २५ सर्प मृत्युमुखी पडलेले होते. पाण्यामधील जैवविविधतेमध्ये आढळणाºया सर्पांपैकी ‘दिवट’ जातीच्या तब्बल २५ सर्पांचा अशाप्रकारे झालेल्या मृत्यूने निसर्गप्रेमी व वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वनकर्मचाºयांनी मृत सापांचा पंचनामा करत पाच सर्पांना सुरक्षित ठिकाणी सोडले. ‘दिवट’ हा सर्प मुख्यत: पाणथळ जागेमध्ये आढळून येतो. हा सर्प शक्यतो समूहाने वावरत असतो व त्याचे प्रमुख खाद्य मासे, बेडूक असे असते.
प्रथमदर्शनी विषप्रयोगाचा संशय
घटनास्थळी पोहचलेल्या कर्मचाºयांना प्रथमदर्शनी पाण्यामध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा संशय आला; मात्र बारकाईने कालव्याच्या पाण्याचे निरीक्षण केल्यानंतर पाण्यामध्ये अन्य मासे, बेडूक असे जलचर सुरक्षितरीत्या हालचाल करताना आढळून आले. त्यामुळे विषप्रयोगाचा घेतला जाणारा संशय संपुष्टात आला. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करून जाळ्यात अडकून श्वास गुदमरल्याने सर्प मृत्युमुखी पडल्याचे वनविभागाला सांगितले.