रामकुंडातून काढला २५ ट्रॅक्टर गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 01:33 AM2022-03-04T01:33:33+5:302022-03-04T01:34:07+5:30
महापालिका पंचवटी विभागाच्या पंचवटी बांधकाम विभागामार्फत गोदावरी नदीपात्रातील कुंडाची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून, रामकुंड येथून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात २५ ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे.
पंचवटी : महापालिका पंचवटी विभागाच्या पंचवटी बांधकाम विभागामार्फत गोदावरी नदीपात्रातील कुंडाची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून, रामकुंड येथून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात २५ ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे.
कुंड स्वच्छता मोहीम अभियानांतर्गत नदीपात्र कुंडातील गाळ, माती, दगड तसेच कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नदीपात्र, कुंड स्वच्छता मोहिमेसाठी एक पोकलेन, दोन जेसीबी, तीन ट्रॅक्ट्रर तसेच वीसपेक्षा अधिक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. गंगाघाटावर असलेल्या रामकुंड, लक्ष्मण कुंड, तसेच टाळकुटेश्वर कुंडात मोठ्या प्रमाणात दगड, गाळ तसेच माती साचल्याने कुंडाची स्वच्छता करणे गरजेचे होते यासाठी मनपा पंचवटी बांधकाम विभागामार्फत नदीपात्र आणि कुंड स्वच्छता
मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या नदीपात्र कुंड स्वच्छता मोहिमेदरम्यान अंदाजे जवळपास २५ ट्रॅक्टर गाळ, माती व दगड काढण्यात आले आहे. नदीपात्रात साचलेला गाळ, दगड आणि माती काढण्याचे काम सुरू असून अजून एक दोन दिवस काम सुरू राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. पंचवटी बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, पंचवटी बांधकाम विभाग अभियंता प्रकाश निकम, पंकज बाप्ते, प्रदीप भामरे, सुनील थलकर, रामदास शिंदे, मदन पिंगळे, मनीष ओगले, जगदीश गावीत, निवृत्ती खैरनार, ज्ञानेश्वर वाघेरे, शंकर ठेपणे आदींसह मनपा कर्मचारी सहभागी झाले आहेत.