२५ टॅँकरने पाणीपुरवठा
By Admin | Published: October 1, 2015 12:19 AM2015-10-01T00:19:56+5:302015-10-01T00:21:21+5:30
२५ टॅँकरने पाणीपुरवठा
नाशिक : दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली असून, १२६ गावे, वाड्यांसाठी २५ टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण अवघ्या ९ टॅँकर इतके होते.
सप्टेंबर अखेर घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्णातील बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या चार तालुक्यांमध्ये अजूनही पाणीटंचाईची झळ कायम असून, २७ गावे, ९९ वाड्या अशा १२६ गावांसाठी २५ टॅँकर ८२ फेऱ्या मारून टंचाईग्रस्त गावांची तहान भागवत आहेत. या शिवाय १९ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. सर्वाधिक टॅँकर सिन्नरसाठी (१२) व त्यानंतर नांदगाव तालुक्यासाठी ७ टॅँकर आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर अखेर २ गावे, ५३ वाड्यांना ९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता व तोही एकट्या सिन्नर तालुक्यातच केला गेला. त्यामानाने यंदा टंचाईची तीव्रता अधिक आहे.