जिल्ह्यात अडीचशे मतदान केंद्रे संवेदनशील
By admin | Published: February 18, 2017 12:19 AM2017-02-18T00:19:36+5:302017-02-18T00:19:52+5:30
सुरगाण्यात १३, तर निफाडला दोन अतिसंवदेनशील केंद्रांचा समावेश
नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला २६५३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, जिल्ह्णात २५३ मतदान केंद्रे संवेदनशील, तर त्यातील १५ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ९४ मतदान केंद्रे संवदेनशील असल्याने तेथे जास्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.
जिल्ह्णातील गत निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊनच पोलीस विभागाने संवदेनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची यादीच तयार केली आहे. या यादीनुसार मतदानाच्या दिवशी या केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, तेथील पोलिसांची गस्तही वाढविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या यादीत १५ मतदान केंद्रे ही अतिसंवेदनशील ठरविण्यात आली असून, त्यात सुरगाणा तालुक्यातील १३ व निफाड तालुक्यातील दोन अतिसंवदेनशील केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुक्यात एका केंद्रांच्या १० टक्के मतदान केंद्रे ही आदर्श करावीत, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने पंधरा तालुक्यांतील ३०० मतदान केंद्रे ही आदर्शवत तयार केली आहेत. या मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, दिव्यांग नागरिकांसाठी रॅम, निवारा शेड, तसेच इतर सोयी-सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका शांततेत तसेच पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने निवडणुकांसाठी तयारी केली आहे. मागील महिन्यात प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ग्रामीण भागातील मतदान केंद्रांना भेटी देत सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केली होती. मालेगाव येथील नुकत्याच झालेल्या गोरक्षा समिती पदाधिकारी मारहाणच्या घटनेनंतर मालेगावमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)