प्रतिचौकसभेसाठी भरा २५० रुपये!
By admin | Published: January 18, 2017 11:32 PM2017-01-18T23:32:44+5:302017-01-18T23:33:03+5:30
दरपत्रक जाहीर : गोल्फ क्लब मैदानासाठी २९ हजार रुपये दर
नाशिक : चौकसभा घ्यायचीय, भरा २५० रुपये; गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा घ्यायचीय, भरा २९ हजार रुपये; बूथ लावायचाय, भरा ९०० रुपये... हे दरपत्रक महापालिका प्रशासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेच्याही खजिन्यात चार पैसे पडणार आहेत. शहरात नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार साहित्य ठिकठिकाणी लावले जाणार आहे. मात्र, सदर प्रचार साहित्य अथवा चौकसभा, जाहीर सभांसाठी संबंधिताना शुल्क आकारणी केली जाणार असून, त्याचे दरपत्रक महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार, प्रतिचौकसभेसाठी २५० रुपये, कापडी बॅनर्ससाठी प्रतिनग २०० रुपये, जाहिरात फलकासाठी प्रतिनग ३०० रुपये, झेंड्यासाठी प्रतिनग १० रुपये, सभेच्या ठिकाणी पोस्टर्स व झेंडे लावण्यासाठी प्रतिनग १० रुपये, खासगी जागांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी प्रतिनग ३०० रुपये, प्रचार वाहनासाठी प्रतिवाहन २५० रुपये, वाहनावरून प्रचार करण्यासाठी प्रतिबॅनर्स २५० रुपये, दहा बाय दहा चौ. फूट जागेत बूथ लावण्यासाठी प्रतिबूथ ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. निवडणुकीच्या प्रचार काळात नेत्यांच्या जाहीर सभाही होतील. व्हीआयपी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टरचा वापर होण्याची शक्यता आहे. गोल्फ क्लब मैदान व सिडकोतील राजे संभाजी स्टेडिअमवर हेलिपॅड उभारण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी एक दिवसाकरिता सेवाकर व्यतिरिक्त ७०० रुपये शुल्क असेल. राजकीय पक्षांना मैदाने समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे.