शनि चौकातील पेशवेकालीन रहाडीला २५० वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:53 AM2018-03-06T01:53:26+5:302018-03-06T01:53:26+5:30
रंगोत्सवाच्या निमित्ताने पंचवटीतील शनि चौकात असलेली पेशवेकालीन रहाड खुली करण्याच्या कामाला सोमवारी (दि. ५) सकाळपासून सुरुवात करण्यात आली. सकाळी पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सुनील महंकाळे, चिंटू भोरे, बंटी भोरे आदींसह मान्यवरांच्या हस्ते रहाडीचे विधीवत पूजन करून श्रीफळ वाढवून खोदकामाला सुरुवात करण्यात आली.
पंचवटी : रंगोत्सवाच्या निमित्ताने पंचवटीतील शनि चौकात असलेली पेशवेकालीन रहाड खुली करण्याच्या कामाला सोमवारी (दि. ५) सकाळपासून सुरुवात करण्यात आली. सकाळी पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सुनील महंकाळे, चिंटू भोरे, बंटी भोरे आदींसह मान्यवरांच्या हस्ते रहाडीचे विधीवत पूजन करून श्रीफळ वाढवून खोदकामाला सुरुवात करण्यात आली. नाशिक शहरातील जुनी पेशवेकालीन रहाड असलेल्या या रहाडाला तब्बल २५० वर्षांचा इतिहास असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. मंगळवारी (दि. ६) रोजी दुपारी रहाडीचे मानकरी कल्पेश दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येईल त्यानंतर दीक्षित सुरुवातीला रहाडीत आंघोळ करतील व त्यानंतर रंगोत्सवाला सुरुवात करण्यात येणार आहे. सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, शनिचौक मित्रमंडळ व सरदारचौक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी रहाडीत रंगोत्सवाचे आयोजन केले जाते. १६ बाय १६ फूट लांबी व रुंदी असलेल्या रहाडीची ९ फूट खोली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही या रहाडीत गुलाबी रंग तयार केला जाणार आहे. रहाडीत दरवर्षी केल्या जाणाºया गुलाबी रंगाचे वैशिष्टे म्हणजे गुलाबी रंग उठावदार दिसतो तसेच या रंगामुळे उन्हाळा बाधत नाही आणि त्वचा रोग बरे होतात. रहाड म्हणजे पूर्वीच्या काळात पहिलवान तसेच गटातटाचे वर्चस्व प्रस्थापित करणाºयांची जागा अशी ओळख होती. रंगाने भरलेल्या रहाडीत आंघोळ केल्यास किमान दोन ते तीन दिवस रंग निघत नाही. अंदाजे सव्वा लाख लिटर पाणी साठवणूक क्षमता असलेल्या या रहाडात धप्पा मारल्यानंतर रहाडीभोवती उभ्या असलेल्या किमान ३० ते ३५ नागरिकांच्या अंगावर रंग उडतो. मंडळांचे अध्यक्ष संतोष भोरे, राजेंद्र अदयप्रभु, मनोज अदयप्रभु, रघुनंदन मुठे, अरविंद विसपुते, महेश महंकाळे आदिंसह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचे सावट पसरल्याने पाण्याची बचत व्हावी, या हेतूने मंडळाच्या आयोजकांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून रहाड बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. गेल्यावर्षी तसेच यंदाही धरणात भरपूर जलसाठा शिल्लक असल्याने रंगोत्सवासाठी रहाड खुली करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नाशिक शहरातील पेशवेकालीन रहाड म्हणून ओळखल्या जाणाºया शनिचौकातील या रहाडीत रंगोत्सवानिमित्ताने रंग खेळण्यासाठी तमाम नाशिककर तसेच शेकडो आबालवृद्ध सज्ज झालेले आहेत.