२५१ फौजदार पोलीस राज्याच्या पोलीस सेवेत दाखल; अकादमीच्या १२३ तुकडीचा दीक्षांत सोहळा

By अझहर शेख | Published: January 17, 2024 01:21 PM2024-01-17T13:21:59+5:302024-01-17T13:27:06+5:30

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक घडविले जातात

251 criminal police inducted into the police service of the State; Convocation ceremony of 123 batch of Academy | २५१ फौजदार पोलीस राज्याच्या पोलीस सेवेत दाखल; अकादमीच्या १२३ तुकडीचा दीक्षांत सोहळा

२५१ फौजदार पोलीस राज्याच्या पोलीस सेवेत दाखल; अकादमीच्या १२३ तुकडीचा दीक्षांत सोहळा

अझहर शेख, नाशिक: पोलीस खात्यात शिपाई पदावरून दाखल झालेल्या पोलिसांनी राज्यसेवा परिक्षा उत्तीर्ण करून खात्यांतर्गत पोलीस उपनिरिक्षक पदाला गवसणी घातली. महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या सत्र क्रमांक १२३ तुकडीतून २५१ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक पोलीस सेवेत बुधवारी (दि.१७) दाखल झाले. उगवत्या दिनकराच्या साक्षीने या तुकडीने पोलीस अकादमीत दिमाखदार संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देऊन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होण्याची शपथ घेतली.

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक घडविले जातात. खात्यांतर्गत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरिक्षकांच्या तुकडीत २४६ पुरूष व ५ महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. ९ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेत या प्रशिक्षणार्थींनी स्वत:चे अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण केले. या तुकडीने हळुवार व गतीमान चालीवर संचलन सादर केले. संचलनाचे नेतृत्व सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरलेले सलमान जाहेर शेख यांनी केले. राज्याचे माजी पोलीस महासंचालक तथा विद्यमान मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार हे या दीक्षांत सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांच्या तुकडीकडून मानवंदना त्यांनी स्वीकारली. यावेळी अकादमीचे संचालक राजेशकुमार यांनी अहवालवाचन केले.

हे ठरले सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी

सर्वोच्च मानाची रिव्हॉल्वर तसेच स्व.यशवंतराव चव्हाण सुवर्ष चषक यापारितोषिकाचे मानकरी अष्टपैलू कामगिरी करणारे परेड कमांडर सलमान शेख हे ठरले. तसेच संतोष कोळगे (बेस्ट ड्रील), अंकुश दुधाळ (बेस्ट लॉ व सिल्वहर बॅटन), रामचंद्र बहुरे (बेस्ट शूटींग), निलेश तळेकर (बेस्ट आउटडोअर), दिपक रहाणे, मीना झाडे (उत्कृष्ट अष्टपैलू महिला).

शेतकरी कुटुंबातील पोरं झाले पोलीस अधिकारी

महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या या प्रशिक्षणार्थींमध्ये बहुसंख्यांकांची पार्श्भभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. सर्वसाधारण कुटुंबातून पोलीस दलात दाखल होऊन अधिकारीपदाला आपल्या मुलांना फौजदार झाल्याचे बघून आई,वडील, भाऊ, बहिणींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळून गेले.

...अशी आहे प्रशिक्षणार्थींची तुकडी

प्रशिक्षणार्थींचे वयोगट २५-४७ वर्षे: मराठवाडा- ४५, पश्चिम महाराष्ट्र-७४, कोकण-५१, विदर्भ-४९ आणि उत्तर महाराष्ट्र-३२ प्रशिक्षणार्थी या १२३व्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरिक्षकांच्या तुकडीत समाविष्ट होते. या तुकडीतील पोलिसांचे २५ ते ४७ वर्षे वयोगट आहे. यापैकी २०८ पदवीधर आहेत.

गुरूमंत्र असा....

आज घेतलेली शपथ आयुष्यभर लक्षात ठेवा, जेणेकरून अडचणीत तुम्हाला मार्ग शोधता येऊ शकेल. अधिकारी म्हणून घेतलेल्या प्रशिक्षणाचा पोलिस दलाच्यामार्फत समाजाला फायदा करून द्यावा. पोलीस उपनिरिक्षक म्हणून सेवा बजावताना निर्णयक्षमता अधिकाधिक विकसित करावी लागणार आहे. यासाठी शारिरिक-मानसिकदृष्ट्या सक्षम व सुदृढ ठेवण्याचा सतत प्रयत्न करा. कायदा व सुव्यवस्था राखताना स्वत:चूकणार नाही, याची दक्षता घ्यावी. भ्रष्टाचार व सायबर गुन्हेगारी ही समाजापुढील मोठी समस्या असून त्याच्या निवारणासाठी योगदान द्यावे, असा गुरूमंत्र मुख्य अतिथी माजी पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी यावेळी प्रशिक्षणार्थी तुकडींना दिला.

Web Title: 251 criminal police inducted into the police service of the State; Convocation ceremony of 123 batch of Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.