२५६० मतदानयंत्रे, १० हजार मनुष्यबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:18+5:302021-01-14T04:13:18+5:30
नाशिक : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी (दि.१४) मतदान कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप ...
नाशिक : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी (दि.१४) मतदान कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदान यंत्राच्या साह्यानेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी २५६० बॅलेट युनिट तर तितकेच कंट्रोल युनिटचा वापर केला जाणार आहे. शुक्रवारी (दि.१५) रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून ११ हजार ५४ उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावत आहेत.
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. अर्ज माघारीपर्यंत ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. १३ तालुक्यांमध्ये होत असलेलेल्या या निवडणुकीची जबाबदारी तालुकापातळीवर तहसील यांच्यावर असून मतदानासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. या कर्मचाऱ्यांना गुरुवारी साहित्य वाटप केले जाणार आहे. निवडणुकीचे साहित्य मिळाल्यानंतर कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर बसेसच्या माध्यमातून पोहोचणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया हेाणार असून १९५२ मतदान केंद्रांवर १२ लाख ८४ हजार १०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्ह्यातील निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयातून निवडणूक साहित्य वाटप केले जाणार असून त्यासाठी निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवड करण्यात आलेली आहे. निवडणूक साहित्य वाहून नेण्यासाठी महामंडळाच्या बसेसचेदेखील नियोजन करण्यात आले आहे.
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहे. गेल्या चार तारखेपासून जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला असून बुधवारी सायंकाळी प्रचाराची सांगता झाली.
--इन्फो--
मतदानासाठी पगारी सुट्टी
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१५ रोजी होणाऱ्या मतदानासाठी नागरी क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाच्या आस्थापना, दुकाने, औद्योगिक आस्थापना अशा ठिकाणी काम करणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी विशेष पगारी रजा देण्यात आली आहे.