पॉलिटेक्निक प्रवेश अर्जासाठी २६ पर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:01 AM2019-06-24T01:01:05+5:302019-06-24T01:01:31+5:30
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अर्थात पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी सध्या प्रक्रिया सुरू असून, आॅनलाइन अर्ज करण्यासाठी विहित मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
नाशिक : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अर्थात पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी सध्या प्रक्रिया सुरू असून, आॅनलाइन अर्ज करण्यासाठी विहित मुदतीत वाढ करण्यात आली आहे. २६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करता येणार असून, २७ जूनला प्रारुप यादी जाहीर होणार आहे.
अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रियेसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाउनचा फटका विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे दहावीनंतर पदविका प्रवेशासाठी नोंदणी व कागदपत्रांच्या अपलोडिंगसाठी २६ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. २७ जूनला प्रारुप यादी जाहीर होईल. तर १ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी ३० मेपासून आॅनलाइन अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी सुरुवातीला १८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, सर्व्हर डाउनची समस्या निर्माण झाल्याने तसेच अनेक विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने ही मुदत २६ जूनपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
डी. फार्मसीसाठी
२७ जूनपर्यंत मुदतवाढ
डीटीईतर्फे डी. फार्मसी, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता २७पर्यंत महाविद्यालयांतील सेतू केंद्रावर प्रवेश अर्ज करता येईल.