संभाजी ब्रिगेडचे २७ कार्यकर्ते निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 05:02 PM2019-02-02T17:02:40+5:302019-02-02T17:03:07+5:30
न्यायालयाचा निकाल : मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास केला होता विरोध
सिन्नर : मराठा आरक्षणाबाबात ठोस भूमिका घेत नसल्याच्या निषेधार्थ १९ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टर शिवनेरी किल्ल्यावर उतरवण्यास विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या २७ कार्यकर्त्यांची राजगुरूनगर (खेड) येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या कार्यकर्त्यांचे नेतृत्व सिन्नरच्या डी. डी. गोर्डे यांनी केले होते.
मराठा आरक्षणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा कार्यकर्ते संतप्त झाले होते. संभाजी ब्रिगेडने आक्रमक रूप धारण केले होते. दरवर्षी १९ फेब्रुवारी राजी शिवजयंतीला राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरीवर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी जात असतात. १९ फेबु्रवारी २००९ रोजी अशोक चव्हाण यांना शिवनेरीवर आल्यास तेथे पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका संभाजीत ब्रिगेडने घेतली होती. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर गडावर पोहचण्यापूर्वीच ब्रिगेडच्या ३ हजारपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी हेलिपॅडसह परिसरात गर्दी केली होती. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला होता. त्यातून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी तेथेच निषेध सभा घेत हा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांना पोलिसांनी शिवनेरीच्या पायथ्याशीच स्थानबद्द केले होते. त्यामुळे सिन्नरचे डी. डी. गोर्डे यांनी आक्रमक भाषण करीत पोलिसांच्या कारवाईला निषेध केला होता. यावेळी धक्काबुक्की होऊन त्यात गोर्डे जखमी झाले होते. त्याचवेळी जमाव संतप्त होऊन पोलिसांबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवरही दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला होता. कार्यक्रम आटोपताच पोलिसांनी २७ कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांची धरपकड सुरू केली होती. गोर्डे यांच्यासह २७ कार्यकर्त्यांना येरवडा जेलमध्ये १० दिवस काढावे लागले होते. त्यानंतर पुण्याच्या न्यायालयात दाव्याचे काम चालले होते. पूढे या खटल्याचे कामकाज राजगुरूनगर (खेड) न्यायालयात चालले. दि. २९ जानेवारी रोजी या खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाने सर्व २७ कार्यकर्त्यांची निर्दोेष मुक्तता केल्याचे गोर्डे यांनी सांगितले.