राज्यातील २७ लाख बहिणींचे आधारच लिंक नाही; पहिल्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता
By संकेत शुक्ला | Published: August 14, 2024 08:56 PM2024-08-14T20:56:01+5:302024-08-14T20:56:28+5:30
लाडकी बहीण योजना : आता आधार लिंक करण्याची मोहीम
नाशिक : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी राज्यात १ कोटी ३५ लाख महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील २७ लाख ४३ हजार ३१४ महिलांचे बँक खाते आधारशी जेाडलेले नसल्यामुळे त्यांना मिळणारी मदत संकटात आली आहे. संबंधित विभागाकडून या महिलांचा संदेश पाठवण्याचे काम सुरू असून बँक खाते आधारशी जोडण्यासाठी मोहीम घेण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील ४ लाख ५२ हजार ५०६ महिलांचा समावेश आहे. या बहिणी आता तीन हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या १७ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेणार आहेत. जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. राज्यात १ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. यात पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत.
जिल्हा आधार लिंक नसलेली खाती
नाशिक १ लाख ४३ हजार ६८३,
अहमदनगर १ लाख २१ हजार ३२७,
जळगाव ९६ हजार ८६०,
धुळे ५० हजार ४६३
नंदुरबार ४० हजार १७३