२७ मि.मी : नाशिककरांना दीड तास परतीच्या पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 08:52 PM2018-09-18T20:52:59+5:302018-09-18T20:59:07+5:30
पावणेपाच वाजेपासून शहरात ढग दाटून येण्यास सुरूवात झाली आणि थंड वारा वाहू लागला होता. पाच वाजता पावसाला सुरूवात झाली. सुमारे पावणेसात वाजेपर्यंत जोरदार पाऊस शहरासह उपनगरीय भागात झाला. अवघ्या पुढील दहा ते पंधरा मिनिटांत पावसाचा जोर कमालीचा वाढला.
नाशिक :नाशिककरांना परतीच्या पावसाची महिनाभरापासून प्रतीक्षा होती. मंगळवारी (दि.१८) संध्याकाळी पाच वाजता परतीच्या पावसाचे ढग शहर व परिसरात दाटून आले अन टपोऱ्या थेंबाच्या जोरदार सरींच्या वर्षावात नाशिककर पुन्हा चिंब झाले. शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळी मुसळधार पाऊसधारा बरसू लागल्याने घरी परतणा-या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
आठवडाभरापासून शहरात उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यामुळे कमाल तपमानाचा पारा थेट ३० अंशापर्यत सरकल्याने सप्टेंबरच्या पंधरवड्यातच नागरिकांना ‘आॅक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला होता. वातावरण उष्ण बनल्याने परतीच्या पावसाची नाशिककर प्रतीक्षा करत होते. अखेर मंगळवारी संध्याकाळी दीड तास जोरदार पाऊस झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अचानक आलेल्या पावसाने संध्याकाळी घरी परतणा-या चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.
पावणेपाच वाजेपासून शहरात ढग दाटून येण्यास सुरूवात झाली आणि थंड वारा वाहू लागला होता. पाच वाजता पावसाला सुरूवात झाली. सुमारे पावणेसात वाजेपर्यंत जोरदार पाऊस शहरासह उपनगरीय भागात झाला. अवघ्या पुढील दहा ते पंधरा मिनिटांत पावसाचा जोर कमालीचा वाढला. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. महापालिका प्रशासनाच्या भुयारी गटार विभागाच्या तयारीचे पितळ परतीच्या पावसाने उघडे पाडले. जुने नाशिक, भद्रकाली, अशोकस्तंभ, घनकर गल्ली, वकिलवाडी, वडाळा आदी भागात गटारींचे सांडपाणी रस्त्यावर वाहतानाचे चित्र दिसले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारविषयी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
जिल्ह्याला परतीच्या पावसाची ओढ
शेतक-यांना परतीच्या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. खरीपाच्या पिकांवर संकट आले असून राज्यभरात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. नाशिक तालुक्यासह दिंडोरी, बागलाण, कळवण, सिन्नर तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यात मंगळवारचा पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाकडे शेतक-यांचे डोळे लागले आहे.